बिग बींची क्रिकेट कॉमेंट्रीवर टीका, पुन्हा हर्षा भोगलेवर निशाणा?
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल नेटवर्किंग साईट्सवर ऍक्टिव्ह असतात.
मुंबई : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल नेटवर्किंग साईट्सवर ऍक्टिव्ह असतात. क्रिकेटबद्दलचं प्रेम अमिताभ नेहमीच ट्विटरवरून व्यक्त करतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टी-20 जिंकल्यावरही अमिताभ बच्चन यांनी ट्विटकरून भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देतानाच बिग बींनी कॉमेंट्रीवर निशाणा साधला.
भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टी-20 जिंकली. शानदार खेळ... खेळाडूंची आक्रमकता आवडली आणि काँमेंट्री करतानाचा दुजाभावही आवडला. अशीच कॉमेंट्री करत राहा. कारण तुम्ही जेव्हा अशी कॉमेंट्री करता तेव्हा भारत जिंकतो... असं ट्विट अमिताभ यांनी केलं आहे.
बिग बींचा पुन्हा हर्षा भोगलेवर निशाणा?
याआधीही २०१६ मध्ये टी-20 वर्ल्ड कपवेळी अमिताभ बच्चन यांनी कॉमेंट्री करणाऱ्या हर्षा भोगलेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. भारतीय कॉमेंटेटरनी प्रत्येक वेळी इतर खेळाडूंबाबत बोलण्याऐवजी आपल्या खेळाडूंविषयी बोलावं, असं ट्विट बिग बींनी केलं होतं.
मला याबद्दल आणखी बोलायची गरज नाही, असं म्हणत धोनीनं बिग बींचं हे ट्विट रिट्विट केलं. या सगळ्या प्रकारानंतर हर्षा भोगलेला वर्षभरापेक्षा जास्त काळ कॉमेंट्री करता आली नाही. मार्च २०१६ नंतर हर्षा भोगले २०१७ साली वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी दिसला.
हर्षा भोगलेनंही दिलं होतं प्रत्युत्तर
अमिताभ बच्चन यांना मी प्रतिक्रिया दिलेली आहे. अमिताभ मला फॉलो करतात हे पाहून मला आनंद आहे तसंच मी उत्साही आहे, असं हर्षा भोगले तेव्हा म्हणाला होता.