सुवर्ण पदक विजेती स्वप्ना बर्मनच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा आले पुढे
सुवर्ण कन्येच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा आले धावून
जकार्ता : इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये सुरु असलेल्या 18 व्या आशियाई स्पर्धेमध्ये हेप्टॅथ्लॉन प्रकारात भारताच्या स्वप्ना बर्मन हिने सुवर्ण पदक जिंकलं. यानंतर स्वप्नाच्या मदतीसाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा पुढे आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार मेडल जिंकणाऱ्या स्वप्नाने म्हटलं होतं की, ती आणखी चांगली कामगिरी करु शकते. जर तिच्या पायासाठी वेगळे बुटं डिजाईन केले गेले तर. स्वप्नाच्या दोन्ही पायांना 6-6 बोटं आहेत.
स्वप्नाच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट जेव्हा लोकांनी आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहोचवली. तेव्हा आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन लगेचच यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, 'मला विश्वास आहे की खेळमंत्री राज्यवर्धन सिंह राठौड यावर लक्ष देत असतील. पण जर तसं नसेल तर मी सहकार्य करायला तयार आहे. स्वप्ना ही खरोखर एक आदर्श आहे.'
स्वप्ना बर्मनने बुधवारी आशियाई स्पर्धेमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं. या फॉरमॅटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय आहे. या फॉरमॅटमध्ये 7 वेगवेगळ्या इवेंटमध्ये खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागते.