महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी भारतीय क्रिकेटर सरफराज खानच्या वडिलांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे. सरफराज खानने भारतीय कसोटी संघात पदार्पण केल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी नौशाद खान यांना थार गिफ्ट करण्याचं आश्वासन दिलं होतं. नौशाद खान यांनी दिलेलं बलिदान, मेहनत यामुळेच सरफराज खान आपलं स्वप्न पूर्ण करत भारतीय संघात दाखल झाला होता. त्यांच्या या त्यागाचा सत्कार करत आनंद महिंद्रा यांनी थार गिफ्ट करण्याचं आश्वासन दिलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नौशाद खान आपल्या कुटुंबासह थार कार घेण्यासाठी पोहोचले होते. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नौशाद खान यांच्यासह सरफराज खानही दिसत आहे. 



आनंद महिंद्रा यांनी काय म्हटलं होतं?


आनंद महिंद्रा यांनी बीसीसीआयचा व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये सरफराज खानला कॅप दिल्यानंतर भावूक झालेले क्षण दाखवण्यात आले होते. आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'फक्त हिंमत सोडू नका. एका पित्यात मेहनत, हिंमत आणि संयम हे गुण असताना मुलाला प्रेरणा मिळण्यासाठी अजून काय हवं. एक प्रेरणादायी पित्या ठरल्याबद्दल नौशाद यांनी जर थार कार गिफ्ट म्हणून स्विकारली तर तो माझा सन्मान असेल'.


इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज आणि ध्रुव पटेल यांना संधी देण्यात आली होती. सरफराजने पहिल्याच सामन्यात 48 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. यासह त्याने पहिल्या कसोटी सामन्यात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं होतं. सरफराजने 9 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याने फक्त 66 चेंडूत 62 धावा केल्या. 



दरम्यान सरफराजने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की, त्याच्या वडिलांनी धावा करत असतानाही भारतीय संघात स्थान मिळत नसताना स्थानिक क्रिकेट खेळताना देशासाठी खेळत असल्याप्रमाणे खेळण्याचा आग्रह केला होता. "मी वडिलांना भारतीय संघात मला स्थान मिळेल का याबद्दल विचारत असे. यावर ते नेहमी मला एकच गोष्ट सांगत असत. पुढील देशांतर्गत सामन्यात भारतीय संघासाठी खेळत असल्याप्रमाणे खेळ आणि तिथेही धावा कर. त्यामुळे माझ्याकडे खेळताना धावा करणं ही एकच जबाबदारी होती," असं त्याने सांगितलं होतं.


आपल्याला सोशल मीडियावरुनही फार पाठिंबा मिळाल्याचं सरफराजने सांगितलं. कसोटी संघात पदार्पण केल्यानंतर माझ्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये 1.5 मिलियनची वाढ झाली असं त्याने सांगितलं.