`फक्त हिंमत सोडू नका`, सरफराज खानच्या वडिलांचा संघर्ष पाहून आनंद महिंद्रांकडून मोठी ऑफर
Anand Mahindra on Sarfaraz Khan: भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना (India vs England Test) सुरु झाल्यानंतर सरफराज खानने (Sarfaraz Khan) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यानिमित्ताने त्याच्या वडिलांच्या संघर्षाचीही चर्चा आहे. याची दखल घेत आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नौशाद खान यांना मोठी ऑफर दिली आहे.
Anand Mahindra on Sarfaraz Khan: भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना (India vs England Test) सुरु झाल्यानंतर सरफराज खानने (Sarfaraz Khan) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सामन्यातून सरफराज खानने भारतीय संघात पदार्पण केलं आहे. रणजी ट्रॉफीत जबरदस्त खेळी करत असतानाही फिटनेसमुळे सरफराज खानला भारतीय संघात स्थान मिळत नव्हतं. पण अखेर त्याची प्रतिक्षा संपली असून मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. दरम्यान यानिमित्ताने त्याचे वडील नौशाद खान यांच्याही संघर्षाचीही चर्चा आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही याची दखल घेत नौशाद खान यांना मोठी ऑफर दिली आहे.
आनंद महिंद्रा यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून नौशाद खान यांचं कौतुक केलं आहे. मेहनत, हिंमत आणि संयम यापेक्षा जास्त चांगले अजून कोणते गुण एका पित्यात हवेत, ज्यामुळे मुलाला प्रेरणा मिळेल अशा शब्दांत त्यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. तसंच आपण तुम्हाला थार कार देऊ इच्छित असल्याची ऑफर दिली आहे.
आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
आनंद महिंद्रा यांनी बीसीसीआयचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सरफराज खानला कॅप दिल्यानंतर भावूक झालेले क्षण दाखवण्यात आले आहेत. आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'फक्त हिंमत सोडू नका. एका पित्यात मेहनत, हिंमत आणि संयम हे गुण असताना मुलाला प्रेरणा मिळण्यासाठी अजून काय हवं. एक प्रेरणादायी पित्या ठरल्याबद्दल नौशाद यांनी जर थार कार गिफ्ट म्हणून स्विकारली तर तो माझा सन्मान असेल'.
तिसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज आणि ध्रुव पटेल यांना संधी देण्यात आली आहे. सरफराजने पहिल्याच सामन्यात 48 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यासह त्याने पहिल्या कसोटी सामन्यात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. सरफराजने 9 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याने फक्त 66 चेंडूत 62 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकाच्या जोरावर 86 ओव्हर्समध्ये 5 गडी गमावत 326 धावा केल्या होत्या.
'सूर्यकुमारने आग्रह केल्याने राजकोटला गेलो'
दरम्यान सरफराजने पत्रकार परिषदेत खुलासा केला की त्याचे वडील हा सामना पाहण्यास येणार नव्हते. त्याचं हे विधान ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. नौशाद खान यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत सरफराजच्या या विधानावर स्पष्टीकरण देत आपण आजारी असल्याने हा सामना पाहायला यायचं नाही असं जवळपास ठरवलं होतं अशी माहिती दिली,
"जगात असे कोणतेही आई-वडील नाहीत जे मुलांना सर्व काही देत नाहीत. त्याच्या नशिबाने त्याला वडील आणि कोच एकाच व्यक्तीत मिळाले," अशी भावना नौशाद खान यांनी व्यक्त केली. नौशाद खान यांनी यावेळी सुर्यकुमार यादवने जबरदस्ती केल्यानेच आपण सामन्याच्या एक दिवस आधी राजकोटला गेल्याची माहिती दिली.