क्रिकेटमध्ये रोज नवनवे रेकॉर्ड होत असतात. यामधील काही रेकॉर्ड कितीही वेळा झाले तरी ते प्रत्येक वेळी तितक्यात उत्साहात साजरे केले जातात. यामधीलच एक रेकॉर्ड म्हणजे एका ओव्हरमध्ये सलग 6 षटकार ठोकणे. युवराज सिंगने 2007 टी-20 वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला लगावलेले सलग 6 षटकार आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आठवणीत आहेत. वेस्ट इंडिजचे महान फलंदाज गॅरी सोबर्स ही कामगिरी करणारे पहिले फलंदाज होते. यानंतर रवी शास्त्री यांनी 1985 मध्ये बडोद्याविरोधात ही कामगिरी करत पहिले भारतीय फलंदाज ठरले होते. दरम्यान या रेकॉर्ड बूकमध्ये आणखी एका भारतीय फलंदाजाची नोंद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 6 षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत हर्षल गिब्स पहिला फलंदाज होता. दरम्यान आता षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आंध्र प्रदेशच्या वामशी कृष्णाचीही नोंद झाली आहे. अंडर-23 कर्नल सीके नायडू ट्रॉफीत खेळताना त्याने हा पराक्रम केला आहे. 


भारतीय डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सध्या अंडर-23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी खेळली जात आहे. या स्पर्धेत वामशी कृष्णाने आपल्या फलंदाजीने खळबळ माजवली आहे. 22 वर्षाच्या या तरुण फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये टी-20 सारखी फलंदाजी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. त्याने एकाच ओव्हरमध्ये सलग 6 षटकार लगावले आहेत. बीसीसीआयनेही याची दखल घेतली असून एक्सवर त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला आहे. 



बीसीसीआयने व्हिडीओ शेअर करताना पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये आंध्रच्या वामशी कृष्णाने रेल्वेचा स्पिनर दमनदीप सिंगच्या गोलंदाजीवर सलग 6 षटकार ठोकले. त्याने 64 चेंडूत 110 धावा केल्या". 


आंध्र प्रदेशने ठोकल्या 378 धावा


अंडर-23 कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेश आणि रेल्वेदरम्यान एक सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आंध्र प्रदेश प्रथम फलंदाजी करत होता. यावेळी आघाडीचा फलंदाज वामशी कृष्णाने फिरकी गोलंदाज दमनदीपला 6 षटकार लगावले. त्याने 64 चेंडूत 110 धावा ठोकत तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीच्या आधारे आंध्रने पहिल्या डाव्यात 378 धावांचा डोंगर उभा केला. 


वामशी कृष्णा या कामगिरीसह रवी शास्त्री, युवराज सिंग आणि ऋतुराज गायकवाड यांच्या पंगतीत सामील झाला आहे. 


विशाखापट्टणमच्या वायएस राजा रेड्डी एसीएस क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात आंध्रचा डाव 378 धावांवर आटोपल्यानंतर रेल्वेनही चांगली फलंदाजी केली. रेल्वेचा आघाडीचा फलंदाज अंश यादवने गोलंदाजांची धुलाई करत 597 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या आधारे 268 धावा कुटल्या. याशिवाय रवी सिंगने 311 चेंडूंमध्ये 17 चौकार आणि 13 षटकारांच्या आधारे 258 धावा केल्या. रेल्वेने पहिल्या डावात 9 विकेट गमावत 865 धावा उभारल्या असून तब्बल 487 धावांची आघाडी घेतली. पण हा सामना अखेर बरोबरीत सुटला.