मोहाली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला. या विजयासोबतच भारताने ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहली भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. या मॅचमध्ये विराट कोहलीने ५२ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. विराटच्या या खेळीमध्ये ४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर दक्षिण आफ्रिकेला २० ओव्हरमध्ये १४९/५ पर्यंत मजल मारता आली. पण फिल्डिंग करत असताना विराटचा रुद्रावतार मैदानात पाहायला मिळाला. १०व्या ओव्हरमध्ये खराब फिल्डिंगमुळे दक्षिण आफ्रिकेला एकच्याऐवजी २ रन मिळाल्या, यामुळे विराट संतापला आणि त्याने स्टम्प उडवला.


हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर श्रेयस अय्यरकडे बॉल गेला, पण यावेळी अय्यरने गोंधळ घातला आणि बॉल चुकीच्या दिशेने फेकला. बॉलिंग करत असलेला हार्दिक पांड्याही थ्रो घेण्यासाठी जागेवर नव्हता, यामुळे विराटचा पारा चढला.



मैदानामध्ये ही घटना घडल्यानंतर विराटने लगेचच क्विंटन डिकॉकचा अफलातून कॅच पडकला. ओपनिंगला बॅटिंगसाठी आलेल्या क्विंटन डिकॉकने ३७ बॉलमध्ये ५२ रनची खेळी केली. क्विंटन डिकॉक दक्षिण आफ्रिकेला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल, असं वाटत असतानाच विराटने नवदीप सैनीच्या बॉलिंगवर जबरदस्त कॅच पकडला.


दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग भारताने १९ ओव्हरमध्ये केला. विराटचं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधलं हे २२वं अर्धशतकं होतं. सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा रोहितचा विक्रमही विराटने मोडला आहे. विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २४४१ रन आहेत, तर रोहितने २,४३४ रन केले आहेत.