ICC Rankings: आयसीसीकडून क्रिकेट क्रमवारी जाहीर, पाहा कोणत्या देशाचा दबदबा, भारत कितव्या स्थानावर
आयसीसीकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटची नविन क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे
Annual ICC Ranking : आयसीसीने क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार टी-20 क्रिकेटमध्ये भारताने यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या टी-20 सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली आहे. याचा फायदा भारतीय क्रिकेट संघाला (Team India) क्रमवारीत झाला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात दमदार कामगिरी
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा पराभव केला. विश्व चषक स्पर्धेनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधार पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर रोहित शर्माने ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिआने टी-20 क्रिकेटमध्ये सातत्यूपर्ण कामगिरी केली आहे.
क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकवर इंग्लंड
टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारताच्या खात्यात 270 पॉईंट जमा आहेत. तर 265 पॉईंट्स सह इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावार आहे. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. या यादीत न्यूझीलंडची मोठी घसरण झाली आहे. न्यूझीलंडला पाच पॉईंटचा फटका बसला असून ते सहाव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. यानंतर वेस्टइंडिज, सातव्या, बांगलादेश आठव्या, श्रीलंका नवव्या आणि अफगाणिस्तान दहाव्या क्रमांकावर आहेत.
कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया टॉप
आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे, तर भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 128 तर भारताच्या खातात 119 पॉईंट्स जमा आहेत. कसोटी क्रमवारीत न्यूझीलंड तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर आहे.
वन डेत न्यूझीलंडचा दबदबा
न्यूझीलंड एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकवर आहे. एकदिवसीय क्रमवारीत भारत (105 गुण) चौथ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियापेक्षा केवळ दोन गुणांनी (107) मागे आहे.