गाबा : अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 9 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या टीमला चांगला खेळ करता आला नाही आणि सामना गमावला. सामना गमावल्यानंतर इंग्लंड संघाला आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसीने त्यांना दंड ठोठावला आहे.


यामुळे आयसीसीने ठोठावला दंड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या ऍशेस कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे हतबल झालेल्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात स्लो ओव्हर-रेटसाठी त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड आकारण्यात आला आहे. यामुळे सामना गमावल्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला. आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना पाच गुण गमावावे लागलेत. 


आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी, निर्धारित वेळेत पाच ओव्हर कमी टाकल्याच्या आरोपावरून हा निर्णय दिला आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना नऊ विकेट्स राखून जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


या फलंदाजालाही लागला दंड


यासह ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडला आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 भंगासाठी त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. हेडने खेळाडू आणि सपोर्ट टीम सदस्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या कलम 2.3 चे उल्लंघन केले आहे, जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अपमानास्पद भाषेच्या वापराशी संबंधित आहे. 


याशिवाय, शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. 24 महिन्यांच्या कालावधीतील हा त्याचा पहिला गुन्हा होता.