तुला तालिबानांची भीती नाही का? पहा आफगाणिस्तानचा कर्णधार काय म्हणाला...
सामन्यानंतर अफगाणिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद नबी पत्रकार परिषद घेत असताना असं काही घडलं की, तो रागावला आणि पत्रकार परिषद सोडून गेला.
दुबई : T-20 वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगला. हा सामना पाकिस्तानने जिंकला पण अफगाणिस्तानच्या खेळाचं सर्वजण कौतुक करत आहेत. हा सामना अनेक अर्थाने चर्चेत होता, सामन्यानंतर अफगाणिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद नबी पत्रकार परिषद घेत असताना असं काही घडलं की, तो रागावला आणि पत्रकार परिषद सोडून गेला.
पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने मोहम्मद नबीला अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती, पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंध आणि अफगाणिस्तानचा संघ वर्ल्डकपनंतर मायदेशी पोहोचल्यावर काय होईल, असा प्रश्न केला, पण मोहम्मद नबीला असा प्रश्न करणं आवडलं नाही.
अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने उत्तर दिलं की, ही परिस्थिती वगळता तुम्ही क्रिकेटबद्दल बोला, फक्त क्रिकेटबद्दल बोलायचं तर ते बरं असेल. आम्ही वर्ल्डकपसाठी आलो आहोत, तुम्ही पूर्ण तयारी करून आला आहात, तुम्ही क्रिकेटबद्दल बोला आणि परिस्थिती सोडून द्या. यानंतरही पाकिस्तानी पत्रकाराने आपला प्रश्न सोडला नाही, त्यामुळे मोहम्मद नबी पत्रकार परिषदेतून उठून निघून गेला.
अफगाणिस्तानात अलीकडे तालिबानी राजवटीने क्रिकेटचं भवितव्य संकटात सापडलं आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील संबंधही तणावपूर्ण आहेत. त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला. दुसरीकडे शुक्रवारी झालेल्या सामन्यात स्टेडियममध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये हाणामारीही झाली. ज्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.