अँटिग्वा: वेस्ट इंडिजने बुधवारी अँटिग्वे येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अवघ्या 43 धावांमध्ये बांगलादेशचा खुर्दा उडवला. ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सहावी निचांकी धावसंख्या ठरली. अँटिग्वा कसोटीत प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा एकही फलंदाज वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यापुढे टिकाव धरू शकला नाही. बांगलादेशचा पहिला डाव १८.४ षटकांमध्ये संपुष्टात आला. 


बांगलादेशला १० धावांवर असताना पहिला धक्का बसला. त्यानंतर फक्त ३३ धावांमध्ये बांगलादेशचा संपूर्ण संघ गारद झाला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक २५ धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. वेस्ट इंडिजच्या रोशने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला. तर मिग्युएल कमिन्स आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी तीन आणि दोन बळी मिळवले.