बंगळुरू : भारताचा माजी फास्ट बॉलर आशिष नेहराला नवी जबाबदारी मिळाली आहे. नेहरा आयपीएलच्या बंगळुरू टीमचा प्रशिक्षक झाला आहे. बंगळुरूनं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. याआधी बंगळुरूनं दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि भारताला २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकवून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. आशिष नेहरा आता गॅरी कर्स्टन यांच्यासोबत प्रशिक्षकपद सांभाळणार आहे. आयपीएलच्या ११व्या मोसमात आशिष नेहरा बंगळुरूचा बॉलिंग प्रशिक्षक होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी बंगळुरूचा प्रशिक्षक होता. पण बंगळुरूची कामगिरी खराब झाल्यामुळे व्हिटोरीची हकालपट्टी करण्यात आली. बंगळुरूची फ्रॅन्चायजीनं कर्णधार विराट कोहलीच्या शिफारसींवरून प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची गच्छंती केल्याचं बोललं जातंय.


आयपीएलच्या इतिहासामध्ये बंगळुरूची टीम ही नेहमीच तगडी म्हणून ओळखली जाते. पण मागच्या ११ मोसमांमध्ये एकदाही बंगळुरूला आयपीएल जिंकता आलं नाही. विराटच्या टीमनं २०१८ साली १४ पैकी फक्त ६ मॅच जिंकल्या होत्या. विराट आणि एबी डिव्हिलियर्ससारखे खेळाडू असूनही बंगळुरूची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर होती.


आशिष नेहरानं १७ टेस्टमध्ये ४४ विकेट, १२० वनडेमध्ये १५७ विकेट आणि २७ टी-२० मॅचमध्ये ३४ विकेट घेतल्या आहेत. अश्विन आणि बुमराहनंतर नेहरा हा टी-२० क्रिकेटमधला भारताचा तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. टी-२० मध्ये अश्विननं ५२ आणि बुमराहनं ३८ विकेट घेतल्या आहेत.