Asia Cup 2022 स्पर्धेत पाकिस्तान नाही तर `हा` संघ धोकादायक, भारतीय संघानं जरा सांभाळूनच
आशिया कप विजेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान प्रमुख दावेदार आहेत. असं असलं तरी एक संघ मोठा उलटफेर करू शकतो.
Asia Cup 2022: आशिया कप स्पर्धेला 27 ऑगस्ट 2022 पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 28 ऑगस्टला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील क्रीडा चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या वर्षी टी 20 वर्ल्डकप असल्याने आशिया कप स्पर्धाही टी 20 फॉर्मेटमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान प्रमुख दावेदार आहेत. असं असलं तरी बांगलादेशचा संघ मोठा उलटफेर करू शकतो. कारण मोठ्या स्पर्धेत बांगलादेशचा उलटफेर करण्याचा इतिहास आहे. बांगलादेशनं अनेक संघांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं आहे.
बांगलादेशनं 2007 एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताला पराभूत करून स्पर्धेतून बाहेर केलं होतं. यामुळे सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड या दिग्गजांचं स्वप्न भंगलं होतं. त्यानंतर 2015 च्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशनं इंग्लंडला बाहेरचा रस्ता दाखवला होता. 2016 च्या टी 20 वर्ल्डकपमध्येही बांगलादेशनं टीम इंडियाला जवळपास बाहेर केलं होतं. मात्र धोनीच्या ऐतिहासिक रन आउट भारताला वाचवलं होतं. भारताने हा सामना फक्त 1 धाव राखून जिंकली होता आणि स्पर्धेतील आशा कायम ठेवल्या होत्या.
आशिया कप 2022 स्पर्धेत एकूण दोन गट असून सहा संघ असणार आहेत. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आहेत. तर गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत.
27 ऑगस्ट- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
28 ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
31 ऑगस्ट- हाँगकाँग विरुद्ध भारत
1 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
2 सप्टेंबर- हाँगकाँग विरुद्ध पाकिस्तान
3 सप्टेंबर- B1 वि B2
4 सप्टेंबर- A1 वि A2
6 सप्टेंबर- A1 विरुद्ध B1
7 सप्टेंबर- A2 विरुद्ध B2
8 सप्टेंबर- A1 विरुद्ध B2
9 सप्टेंबर- B1 विरुद्ध A2
11 सप्टेंबर- अंतिम सामना