भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने यायला कारण ठरलेली राऊंड रॉबिन सिस्टीम काय आहे?
रविवारी भारत विरद्ध पाकिस्तान असा थरार पुन्हा पाहायला मिळणार आहे
आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) पाकिस्तानने हाँगकाँगवर (PAK vs HKG) मिळवलेल्या विजयानंतर स्पर्धेच्या सुपर 4 स्टेजचे (Super 4) वेळापत्रक स्पष्ट झाले आहे. बाबर आझमच्या संघाने शुक्रवारी हाँगकाँगवर 155 धावांनी दणदणीत विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. सुपर 4 मध्ये भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंका पाकिस्तानपुढे पात्र ठरले आहेत.
दुसरीकडे, बांगलादेश आणि हाँगकाँगला पहिल्या टप्प्यात एकही सामना जिंकता न आल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. अ गटातून भारत आणि पाकिस्तान सुपर 4 साठी पात्र ठरले आहेत, तर ब गटातून अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी पुढच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. भारत आणि अफगाणिस्तानच्या संघाने एकही सामना गमावलेल नाही.
सुपर 4 स्टेजमधील चार संघांची नावे स्पष्ट झाल्यानंतर अंतिम वेळापत्रकही समोर आलं आहे. या स्टेजमध्ये सर्व संघांना प्रत्येक संघाविरुद्ध राऊंड रॉबिन सिस्टीमच्या आधारे एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 मधील पहिला सामना शनिवारी 3 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. तर भारत 4 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (ind vs pak) विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सुपर 4 मध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 4 सप्टेंबरला रविवारी भारताविरुद्ध दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. पण पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान कसे भिडणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राऊंड रॉबिन सिस्टीममुळे भारत पाकिस्तान यांच्यात ही लढत होणार आहे.
राऊंड रॉबिन सिस्टीम म्हणजे काय?
राऊंड रॉबिन सिस्टीममध्ये प्रत्येक संघ लीग टप्प्यात प्रत्येक संघाशी खेळतो. जसे की वर्ल्डकप 2019 मध्ये एकूण 10 संघ होते. त्यामुळे प्रत्येक संघ सर्व 9 संघांसोबत एकदाच खेळला होता. क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा आयोजित करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे प्रत्येक संघ सर्व संघांशी खेळणार असल्याने कोणालाही अतिरिक्त फायदा होत नाही.
यामध्ये ज्या संघाला कमी पॉईंट मिळतात तो संघ स्पर्धेतून बाहेर पडतो. त्यामुळे आयपीएल, बिगबॉश तसेच अनेक देशांतर्गत लीगमध्ये ही सिस्टीम वापरली जाते. त्यामुळे सर्वात जास्त पॉईंट मिळवणारे संघच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतात. आशिया कप स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान अ गटात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा भिडणार आहेत.