Asia Cup सुरु असतानाच मोठी बातमी, तो घातक बॉलर परततोय, Video द्वारे केली घोषणा
India vs Pakistan दुखापतीतून सावरत पुनरागमनासाठी होतोय सज्ज, टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार
Asia Cup 2022 : एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) सुपर फोरचे (Super 4) सामने सुरु असून पहिल्या दोन सामन्यात मोठा उलटफेर पाहिला मिळालाय. चुरशीच्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा (Sri Lanka Beat Afghanistan) पराभव केला तर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर (India vs Pakistan) मात केली. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रीदी (Shaheen Shah Afridi) लवकरच पुनरागमन करणार आहे. दुखापतीमुळे शाहिन शाहला एशिया कपमधून बाहेर व्हावं लागलंय. सध्या तो लंडनमध्ये उपचार घेत आहे.
शाहिन शाह आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत (shaheen shah afridi knee injury) झाली आहे. यातून सावरण्यासाठी त्याला बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पण आता स्वत: शाहिन शाह आफ्रिदीने लवकरच पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट चाहतेही खूश झाले आहेत.
भारताविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघातील नसीम शाह (Naseem Shah) आणि हॅरिस रौफ (Haris Rauf) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शाहिन शाह आफ्रिदीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी शाहिन शाहच्या तब्येतीची विचारपूस केली. या संभाषणादरम्यान शाहिन शाहने पुनरागमनचे संकेत दिले. पाकिस्तान क्रिकेटर्स आणि शाहिन शाहच्या संभाषणाचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) सोशल मीडियावर शेअर केला आहे. दुखापतीतून सावरत असल्याचं सांगत शाहिन शाहने पुढच्या दोन आठवड्यात गोलंदाजीच्या सरावाला सुरवात करु शकू असं म्हटलं आहे.
दुखापतीतून लवकर बरं झाल्यास न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) मालिकेत मैदानात ऊतरु असा विश्वासही शाहिन शाह आफ्रिदीने व्यक्त केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये भेटू असंही शाहिन शाहने नसीम आणि रौफला सांगितलं.
पाकिस्तानचा न्यूझीलंड दौरा
टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तानचा संघ एक तिरंगी टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत तिसरा संघ बांगलादेशचा आहे. मालिकेची सुरुवात 7 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्याने होणार आहे. तर 8 ऑक्टोबरला पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ आमने सामने येणार आहेत. 14 ऑक्टोबरपर्यंत ही मालिका रंगणार आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी शाहिन शाह आफ्रिदी पाकिस्तान संघात परतला तर टी20 वर्ल्ड कपमध्येही तो खेळताना दिसणार आहे. शाहिन शाहचं पुनरागमन झाल्यास पाकिस्तान क्रिकेट संघासाठी तो मोठा आधार असेल.
दरम्यान, शाहिन शाहने नसीम आणि रौफशी बोलताना एशिया कप आपल्याला भेट म्हणून घेऊन या असंही सांगितलं.