Asia Cup 2022 स्पर्धेत विराट की बाबरची बॅट तळपणार? आकडेवारी वाचून बसेल धक्का
आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होणार असून भारत पाकिस्तान सामना 28 ऑगस्टला होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र असं असताना या सामन्यात कुणाची बॅट तळपणार? याची उत्सुकता आहे.
Asia Cup 2022: आशिया कप स्पर्धेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. खासकरून भारत पाकिस्तान सामन्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होणार असून भारत पाकिस्तान सामना 28 ऑगस्टला होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र असं असताना या सामन्यात कुणाची बॅट तळपणार? याची उत्सुकता आहे. त्यामुळे फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीला सूर गवसणार की बाबर आझम भारतासाठी डोकेदुखी ठरणार? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार एकमेकांचे चाहते सोशल मीडियावर भिडले आहेत.
2022 या वर्षातील टी 20 सामन्यात विराट आणि बाबर या दोन्ही खेळाडूंची बॅट हवी तशी चालली नाही. विराटने 4 सामन्यात फक्त 81 धावा केल्या. तर बाबर आझमने एकच टी 20 सामना खेळला आणि त्यात 66 धावा केल्या. पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीने चांगल्या धावा केल्या आहेत. मागच्या टी 20 वर्ल्डकपमध्येही विराटने चांगली फलंदाजी केली होती. विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध 7 टी 20 सामन्यात 77 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
दुसरीकडे पाकिस्तानच्या बाबर आझमने भारताविरुद्ध फक्त एक टी 20 सामना खेळला आहे. मागच्या वर्षातील टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध नाबाद 68 धावांची खेळी केली. त्यामुळे बाबर आझमचा आक्रमक पवित्रा भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटबाबत बोलायचं झालं तर, विराट कोहली बाबर आझमच्या थोडासा का होईना पुढे आहे. विराटने 99 टी 20 सामन्यात 50 च्या सरासरीने 3308 धावा केल्या आहेत. विराटने 137 च्या स्ट्राईकरेटने या धावा केल्या आहेत. दुसरीकडे बाबरने एकूण 74 टी 20 सामन्यात 2686 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 129 आहे. तर बॅटिंग स्ट्राईक रेट सरासरी 45 आहे.