आफ्रिदीने कोहलीला बोल्ड केल्यानंतर गंभीर चांगलाच संतापला! म्हणाला, `विराट असे फटके...`
Asia Cup 2023 Gautam Gambhir On Virat Kohli Bowled By Shaheen Afridi: विराट कोहली 6 चेंडूंमध्ये 4 धावा करुन शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाल्यानंतर गंभीरने व्यक्त केला संताप.
Asia Cup 2023 Gautam Gambhir On Virat Kohli Bowled By Shaheen Afridi: भारताने नेपाळविरुद्धचा सामना जिंकत आशिया चषक स्पर्धेतील 'सुपर-4'मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान असं असलं तरी या सामन्यापूर्वी झालेला पाकिस्तानचा सामना अजूनही चर्चेत असून या सामन्यात विराट कोहली केवळ 4 धावांवर बाद झाला होता. विराट कोहलीला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने बोल्ड केलं. विराट फलंदाजीसाठी आला तेव्हा सुरुवातील एक सुंदर चौकार कव्हर ड्राइव्हच्या दिशेनं लगावला. मात्र सातव्या षटकामध्ये शाहीनचा चेंडू खेळून काढण्याच्या नादात विराटच्या बॅटला बॉल लागून थेट स्टम्पला आदळला. कोहली ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. विराट हा चेंडू खेळताना त्याच्या पायांची फारशी हलचाल झाली नाही असं निरिक्षणही काहींनी नोंदवलं आहे. विराटच्या या विकेटबद्दल बोलताना भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही आपलं मत नोंदवलं आहे.
नक्की वाचा >> 'त्याला देशाबद्दल काहीच वाटत नाही'; मुलाच्या जन्मावरुन बुमराहवर सडकून टीका; धोनीचं मात्र कौतुक
वकारकडून शाहीनचं कौतुक
विराट बाद झाला तेव्हा कॉमेंट्री करणारा माजी गोलंदाज वकार यूनुसने शाहीनने टाकलेल्या लेंथ डिलेव्हरीचं कौतुक केलं. वकारने स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करताना, "कोहली थोडा दुर्देवी ठरला. बॅटची आतली कड लागून चेंडू स्टम्पवर गेला. त्याची नजर आणि चेंडू दोन्ही अपेक्षेपेक्षा थोडे खाली राहिलं. मात्र चेंडूची लेंथ बदलण्याचं पूर्ण श्रेय हे शाहीनलाच द्यावं लागेल," असं म्हणत या चेंडूचं कौतुक केलं.
गंभीर विराटवर संतापला
दुसरीकडे गौतम गंभीरनेही विराट ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. विराट बाद होण्याची पद्धत फारच चुकीची होती असं गंभीरने संतापून म्हटलं आहे. विराट बाद झाल्यानंतर कॉमेंट्री करणाऱ्या गंभीरने विराट शाहीनच्या चेंडूवर का बाद झाला याबद्दल भाष्य केलं.
नक्की वाचा >> जय शाहांच्या आडमुठेपणाचा Asia Cup ला फटका? पाकिस्तान गंभीर आरोप करत म्हणाला, 'आम्ही अनेकदा...'
"कोहलीने जो फटका मारला तो खरं तर योग्य फटका नव्हता. हा कोणताही क्रिकेटींग शॉट नाही. कोहली चेंडू खेळण्यासाठी मागेही गेला नाही आणि पुढेही आला नाही. कोहली असे फटके मारण्याचा प्रयत्न करतो हे पाहून हैराण व्हायला होतं. विराट शॉर्ट सिलेक्शनसंदर्भात फारच बेजबाबदार वाटला. जेव्हा तुम्ही शाहीन शाह आफ्रिदीसारख्या गोलंदाजासमोर खेळत असता तेव्हा तुम्हाला कळत नाही की फ्रण्ट फूटवर येऊन खेळावं की बॅक फूटवर जाऊन. विराट खरोखरच त्याच्याविरुद्ध खेळताना गोंधळून गेलेला दिसला," असं गंभीरने विराट का बाद झाला याबद्दल आपलं निरिक्षण नोंदवताना म्हटलं.
विराटची ती सवय ठरतेय घातक
विराट कोहली बाद झाल्यानंतर सोशल मीडियावरुनही त्याच्या फलंदाजीच्या शैलीवर टीका करण्यात आली. अनेकदा विराट ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शाहीन शाह आफ्रिदीनेही हेच केलं आणि विराट नेहमीप्रमाणे हा चेंडू खेळण्याच्या नादात केवळ 4 धावा करुन तंबूत परतला. पाकिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाने भारताच्या 4 खेळाडूंना बाद केलं. ज्यामध्ये रोहित शर्माचाही समावेश होता. रोहित शर्मालाही शाहीनने क्लिन बोल्ड केलं. हारिस रौफ आणि नसीम शाहनेही प्रत्येकी 3 विकेट्स या सामन्यात घेतल्या. भारताला 266 धावांपर्यंतच मजल मारता आली. मात्र पावसामुळे दुसरा डाव खेळण्यासाठी खेळाडूंना मैदानात उतरण्याची संधीच मिळाली नाही. हा सामना अनिर्णित राहिला.