`मला रोहित शर्माची दया येते`; माजी श्रीलंकन क्रिकेटपटू असं का म्हणाला?
Asia Cup 2023 Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मागील 3 सामन्यांमध्ये सलग 3 अर्धशतकं झळकावली आहेत. रोहितने अशाप्रकारे सलग 3 वेळा अर्धशतकं झळकावण्याची ही सातवी वेळ आहे.
Asia Cup 2023 Rohit Sharma: आशिया चषक स्पर्धेच्या 'सुपर-4' फेरीमध्ये भारताने श्रीलंकेला 41 धावांनी पराभूत करुन अंतिम सामन्यात आपलं स्थान निश्चित केलं. मात्र या सामन्यामध्ये फंलदाजीचा उत्तम सुरुवात केल्यानंतर भारतीय फलंदाजीची पडझड झाली आणि भारताचा डाव 213 धावांवर आटोपला. भारतीय फिरकी गोलंदाजांच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला आहे. तरी या सामन्यामध्ये एका क्षणी समालोचन सुरु असतानाच श्रीलंकेचा माजी फलंदाज मार्वन अटापटूने आपल्याला रोहितची दया येते असं म्हटलं. भारतीय समालोचक संजय मांजरेकरनेही रोहितबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हटलं.
पहिल्यांदाच असं घडलं
खरं तर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र संघाची धावसंख्या 80 वर असताना शुभमन बाद झाला. डुनिथ वेललेजने त्याला बाद केलं. त्यानंतर आपल्या पुढल्याच ओव्हरमध्ये डुनिथने रोहितला बोल्ड केलं. डुनिथच्या षटकाच्या पाचवा चेंडू खेळून काढण्याच्या प्रयत्नात रोहित बोल्ड झाला. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकन फिरकी गोलंदाजीच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाज उभेच राहत नव्हते अशी परिस्थिती निर्माण झालेली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्व भारतीय खेळाडूंना फिरकी गोलंदाजांनी बाद केल्याचा प्रकार या सामन्यात पाहायला मिळालं.
मला दया येतेय
'स्टार स्पोर्ट्स'वर या सामन्यासाठी समालोचन करताना मार्वन अटापटू आणि संजय मांजरेकर यांनी रोहित ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर भाष्य केलं. डुनिथ वेललेजने रोहितला बाद केलं. रोहितने बाद होण्याच्या आधीच सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. डुनिथ वेललेजने ज्या चेंडूवर रोहितला बाद केलं त्या टप्पा पडल्यानंतर उसळीच घेतली नाही. रोहित चेंडू प्लेट करुन खेळून काढण्याच्या विचारात असतानाच त्याला काय घडतंय हे समजण्याआधीच चेंडू स्टम्पला जाऊन आदळला. रोहित बाद झाल्यानंतर आटापटूने, "मला काय बोलावं हे कळतं नाही. मला त्याच्यासाठी फार वाईट वाटतंय. मला त्याची दया येत आहे. जगातला इतर कोणताही फलंदाज असता तरी त्याने अशाच पद्धतीने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला असता," असं म्हटलं.
गोलंदाजाचं कौतुक
संजय मांजरेकर यांनीही रोहित बाद झाल्यानंतर मांजरेकरने डुनिथ वेललेजच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. चेंडूने उसळी न घेतल्यानेच रोहित बाद झाल्याचंही ते म्हणाले. "उत्तम लेथंचा चेंडू होता हा. मी अशा गोलंदाजीचा मोठा चाहता आहे. या तरुण खेळाडूने टाकलेला लेंथ बॉल खेळण्यासाठी रोहित तयार नव्हता. रोहित फ्रट फूटवरही खेळत नव्हता आणि बॅक फूटवरही नव्हता. दुर्देवाने चेंडू खालीच राहीला मात्र यासाठी फलंदाजावर टीका करण्याऐवजी तुम्ही गोलंदाजांचा श्रेय दिलं पाहिजे," असं मांजरेकर यांनी म्हटलं.
रोहितचे 2 विक्रम
रोहित अर्धशतक झळकावून बाद झाला. मात्र त्याने या सामन्यात 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्याने 2 षटकार लगावत आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावण्याचा शाहीद आफ्रिदीचा विक्रमही मोडीत काढला.