भारतीय क्रिकेट संघाचा स्टाऱ खेळाडू विराट कोहली आपलं करिअर संपेपर्यंत तीन आकडी शतकांचा टप्पा गाठेल अशी भविष्यवाणी पाकिस्तानी संघाचा माजी दिग्गज खेळाडू वकार युनिसने केली आहे. विराट कोहली शतकांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला फक्त मागेच टाकणार नाही, तर कोणी विचारही केला नसेल इतकी शतकं ठोकेल असं त्याने म्हटलं आहे. पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील 47 वं शतक ठोकलं. यानंतर वकार युनिसने ही भविष्यवाणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकांचा रेकॉर्ड केला आहे. दरम्यान, विराट कोहली आता सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यापासून फक्त दोन शतकं दूर आहे. दरम्यान, पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहलीने आपला आदर्श असणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या 13 हजार धावांचा रेकॉर्ड मोडला. विराट कोहली हा सर्वात वेगाने 13 हजार धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज ठरला आहे. 


पाकिस्तानविरोधातील सामन्यात एकदा विराट कोहलीने ऐतिहासिक कामगिरी केली. रिझर्व्ह डेला खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने पहिल्याच चेंडूपासून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई कऱण्यास सुरुवात केली होती. विराटने 55 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. यानंतर त्याने फक्त 22 चेंडूत शतक ठोकलं. फक्त 84 चेंडूत विराट कोहलीने आपलं शतक पूर्ण केलं. त्याने एकूण 122 धावा केल्या. 


एकीकडे विराट कोहली पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत असताना, दुसरीकडे दुखापतीतून सावरलेला के एल राहुलही जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्यानेही 106 चेंडूत 111 धावा ठोकल्या. दोघांच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 356 धावांचा डोंगर उभा केला होता. फक्त शेवटच्या 8 ओव्हरमध्ये दोघांनी 92 धावा कुटल्या. 


"इतर खेळाडू आणि विराट कोहलीत फार फरक आहे. सचिन तेंडुलकरही यासाठी अपवाद नाही. सचिन तेंडुलकरने जेव्हा निवृत्ती घेतली तेव्हा त्याच्या नावे 49 शतकं होती. मी तुम्हाला सांगतो विराट अजून बरंच करिअर बाकी आहे. त्यामुळे जेव्हा तो खेळणं बंद करेल तेव्हा त्याच्या नावे तुम्ही विचारही करु शकत नाही इतकी शतकं जमा असतील," असं वकार युनिसने सांगितलं आहे. 


'के एल राहुलसाठी वाईट वाटत आहे'


विराट कोहली आणि के एल राहुल यांनी दुसऱ्या आशिया कपमध्ये भागीदारीचा नवा रेकॉर्ड केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 233 धावांची भागीदारी रचली. यामधील 114 धावा चौकार आणि षटकारातून आल्या. इतर धावा दोघांनी विकेटदरम्यान धावून काढल्या. विराट कोहली आणि राहुलने पाकिस्तानी क्षेत्ररक्षणाला चकवा देत अनेक चोरट्या धावा काढल्या. 


"मला के एल राहुलसाठी फार वाईट वाटत आहे. कारण तो नुकताच दुखापतीतून सावरला असून, त्याला त्याच्यासह धावावं लागत आहे. विराट एखाद्या वेड्याप्रमाणे धावतो. तो एकही धाव सोडत नाही. तसंच एखादी अतिरिक्त धाव मिळत असली तर तीही घेतो. आपण जे काही करु त्यात सर्वोत्तम असलं पाहिजे असा त्याचा प्रयत्न असतो. मग ती फलंदाजी, क्षेत्ररक्षण किंवा मग धावणं असो. त्याला त्याचा फिटनेस प्रचंड आवडतो," अशी स्तुती वकार युनिसने केली आहे. 


विराट कोहलीने पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढल्यानंतर कुलदीप यादवने पाकिस्तानी फलंदाजांची फिरकी घेतेली. त्याने 5 विकेट्स मिळवले. पाकिस्तान संघ 128 वर सर्वबाद झाला आणि भारताने 228 धावांनी सामना जिंकत इतिहास रचला.