Asia Cup: `12 खेळाडूंसह खेळत होते,` भारताविरोधातील पराभवानंतर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाची पोस्ट व्हायरल
आशिया कपमध्ये श्रीलंकेविरोधात झालेल्या पराभवानंतर लसिथ मलिंगा याने केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
आशिया कपच्या सुपर 4 फेरीत भारताने श्रीलंकेचा पराभव करत अंतिम सामन्यातील आपलं स्थान निश्चित केलं आहे. मात्र भारताने हा सामना जिंकला असला तरी श्रीलंकेच्या एका खेळाडूने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दुनिथ वेलालगेने आपल्या खेळीने क्रिकेटतज्ज्ञ आणि चाहत्यांना आश्चर्याचे धक्के दिले. फक्त श्रीलंकाच नाही, तर भारतातील प्रेक्षकांनीही या खेळाडूवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. दुनिथ वेलालगेने विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल असे मोठे विकेट्स मिळवत 5 गडी बाद केले. इतकंच नाही तर त्याने 42 चेंडूत 46 धावा ठोकत फलंदाजीतही कमाल केली. पण दुनिथ वेलालगेचे प्रयत्न एकतर्फी ठरले. कारण श्रीलंकेचे इतर खेळाडू फार चांगली कामगिरी करु शकले नाहीत. यादरम्यान श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगाने एक मोठं विधान केलं आहे.
लसिथ मलिंगाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये मलिंगाने दुनिथ वेलालगेच्या खेळीचं कौतुक केलं आहे. असं वाटत होतं की, श्रीलंका 12 खेळांडूंसह खेळत होती असं मलिंगाने म्हटलं आहे. तसंच भविष्यात हा फार मोठा खेळाडू होईल अशी भविष्यवाणीही वर्तवली आहे.
"दुनिथ वेलालगे इतका चांगला खेळला आहे की, श्रीलंका 12 खेळाडूंसह मैदानात खेळत होती असं म्हणणं वावगं ठरणार नाही," असं लसिथ मलिंगाने एक्सवर (ट्विटर) म्हटलं आहे. पुढे त्याने लिहिलं आहे की "आपल्या अष्टपैलू कौशल्यामुळे तरुण वयात तो एक उत्तम खेळाडू ठरत आहे. मला वाटतं पुढील दशकात श्रीलंकेचा एक महान खेळाडू होण्याच्या दिशेने त्याने वाटचाल सुरु केली आहे".
"माझ्यासाठी विराट कोहली हा जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. मला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची विकेट मिळाली याचा आनंद आहे. माझा माझं कौशल्य आणि स्वत:वर विश्वास आहे," असं दुनिथ वेलालगेने सामना संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. दुनिथ वेलालगेने अनुभवी फलंदाजांविरोधात गोलंदाजी करताना आपण विकेट टू विकेट चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होतो असं सांगितलं.
"भारतीय संघ चांगलाच स्थिरावला होता आणि त्यांना जबरदस्त सुरुवात मिळाली होती. मी फक्त विकेट टू विकेट गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला. एकदा आम्हाला ते तीन विकेट मिळाले, तेव्हा भारताला दबावाखाली टाकणं सहज झालं," असंही दुनिथ वेलालगेने म्हटलं. आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना त्याने सांगितलं की "खेळपट्टीवर चेंडू फिरत होता आणि जेव्हा तुम्ही योग्य जागी चेंडू टाकता तेव्हा फलंदाजाला चकवू शकता. पण जर आम्ही जिंकलो असतो तर जास्त आनंद झाला असता".