Jasprit Bumrah Team India Comeback: जसप्रीत बुमराहने पाठीच्या शस्त्रक्रीयेनंतर पुनरागमन केलं आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये भारताचं नेतृत्व बुमराह करत आहे. जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर मैदानात उतरलेला बुमराह आपल्या पहिल्याच परीक्षेत पास झाला आहे. कर्णधार म्हणून आणि गोलंदाज म्हणूनही त्याने उत्तम कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पुनरागमन करताना पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. सामन्यामध्ये बुमराह त्याच्या जुन्या शैलीत दिसला. त्याने अगदी उत्तम पद्धतीने 4 ओव्हर टाकल्या. त्याची कामगिरी पाहून पुन्हा एकदा तो फलंदाजांची झोप उडवण्यासाठी तयार असल्याचं दिसून आलं. बुमराहच्या या पुनरागमनामुळे केवळ विरोधी संघांची झोप उडाली आहे असं नाही तर भारतीय संघातील एका खेळाडूचं स्थानही धोक्यात आलं आहे. ज्या व्यक्तीचं स्थान धोक्यात आलं आहे तिचं नाव आहे, हार्दिक पंड्या!


बुमराहमुळे नेमका कोणाला आणि कसा धोका?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसप्रीत बुमराहने केलेल्या दमदार पुनरगामनामुळे हार्दिक पंड्याकडून उपकर्णधारपद काढून घेतलं जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पीटीआयने दिलेल्या एका वृत्तानुसार, भारतीय संघामध्ये पुनरगामन करणारा बुमहार हा हार्दिकसाठी धोक्याची घंटा ठरु शकतो. भारतीय संघाच्या उपकर्णधारपदासाठी हार्दिक पंड्या आणि बुमराहमध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेमध्ये बुमराह हार्दिकपेक्षा आघाडीवर आहे. बुमराहला आशिया चषक स्पर्धेबरोबरच वर्ल्डकप स्पर्धेमध्येही रोहित शर्माबरोबर उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.


बुमराहाला प्राधान्य का?


हार्दिकऐवजी बुमराहला उपकर्णधार म्हणून प्राधान्य दिलं जाण्याचं मुख्य कारण म्हणजे बुमराह हा पंड्यापेक्षा वरिष्ठ खेळाडू आहे. बुमराह मागील वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यानच्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाला उपकर्णधार होता. मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये रोहित शर्मा जायबंदी असताना इंग्लंडच्या दौऱ्यावरील एकमेवक कसोटी सामन्यामध्ये बुमराहने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळेच आशिया चषकासाठी संघ जाहीर होताना बुमराहचा नक्कीच उपकर्णधार म्हणून निवडकर्त्यांकडून विचार केला जाईल.



ऋतुराज कर्णधार असेल असं वाटलं होतं पण...


बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "जर तुम्हाला आशिया चषक आणि वर्ल्डकप स्पर्धेसाठी बुमराह उपकर्णधार म्हणून दिसला तर आश्चर्यचकित होण्यासारखं काहीच नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे आयर्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये भारताचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडऐवजी बुमराहला देण्यात आलं. ऋतुराज आयर्लंड दौऱ्यानंतर आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. असं असताना आयर्लंडच्या दौऱ्यावरही तोच कर्णधार असेल असं समजलं जात होतं. मात्र तसं घडलं नाही."


वेस्ट इंडिजविरुद्धचा पराभव भोवणार?


सूत्रांनी व्यक्त केलेल्या शक्यतनेनुसार निर्णय झाला तर हार्दिक पंड्याकडून एकदिवसीय क्रिकेटमधील उपकर्णधार पद काढून घेतलं जाईल. भविष्यात विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या कर्णधार पदासाठी जेव्हा खेळाडूंचा विचार केला जाईल तेव्हा रोहित शर्माच्या जागी पहिलं प्राधान्य बुमराहलाच दिलं जाईल असं म्हटलं जात आहे. हार्दिक पंड्या सध्या टी-20 संघाचं नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 5 मालिका जिंकल्या. मात्र दुबळ्या वेस्ट इंडिजसमोर भारताचा पराभव झाला. या पराभवामुळे पंड्याच्या नेतृत्व गुणांवर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. या संपूर्ण मालिकेमध्ये खेळाडूंची निवड, संघाचं व्यवस्थापन यासारख्या गोष्टींवरुन अनेक दिग्गजांनी आक्षेप घेतल्याचं पहायला मिळालं.