एशियन गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडू सध्या सुवर्ण कामगिरी करत असल्याने भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. पण त्यातच एका भारतीय खेळाडूमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याचं कारण भारतीय महिला खेळाडूने आपल्याच सहकारी खेळाडूला ट्रान्सजेंडर म्हटलं आहे. स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना 'एका ट्रान्सजेंडरमुळे मी पदक गमावलं' असं विधान भारतीय महिला हेप्टाथलॉन खेळाडू स्वप्ना बर्मनने केलं. तिचं हे विधान नंदिनी अगसरावर हिच्यासंबंधी होतं. एक्सवर ही पोस्ट केल्यानंतर काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली. पण यानंतर मोठा वाद पेटला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी 1 ऑक्टोबरला महिला हेप्टाथलॉनच्या अंतिम स्पर्धेत भारतीय खेळाडू स्वप्ना बर्मन चौथ्या क्रमांकावर आली. एका क्रमांकामुळे तिचं पदक हुकलं. भारतीय खेळाडू नंदिनी अगसरा तिसऱ्या क्रमांकावर आल्याने स्वप्ना बर्मनचं पदक जिंकण्याचं स्वप्न थोडक्यात हुकलं. नंदिनी या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर आल्याने, कांस्यपदकाने सन्मानित करण्यात आलं. दुसरीकडे स्वप्नाला रिकाम्या हाती परतावं लागलं. 



स्पर्धेतील पराभवानंतर स्वप्ना बर्मनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठा वाद निर्माण केला. कांस्यपदक जिंकणारी खेळाडू ट्रान्सजेंडर असून, ती या स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र नव्हती अशी पोस्ट स्वप्ना बर्मनने एक्सवर शेअर केली होती. यानंतर तिने ही पोस्ट डिलीट केली होती. 


स्वप्नाने पोस्टमध्ये काय लिहिलं होतं?


स्वप्ना बर्मनने पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "चीनमधील हांगझू येथे सुरु असलेल्या 19 व्या एशियन गेम्समध्ये मला एका ट्रान्सजेंडर महिलेच्या हाती कांस्यपदक गमवावं लागलं. मला माझं पदक परत बवं आहे, कारण हे अॅथलेटिक्सच्या नियमांच्या विरोधात आहे. कृपया मला मदत करा आणि मला साथ द्या". 



नंदिनीने एकूण 5712 गुण मिळविले, जो वैयक्तिक सर्वोत्तम रेकॉर्ड आहे. 800 मीटर शर्यतीच्या अंतिम स्पर्धेत तिने अव्वल स्थान पटकावलं. 800 मीटर स्पर्धेव्यतिरिक्त, नंदिनीने 200 मीटर शर्यत जिंकली, ज्यामुळे तिला 936 गुण मिळाले. दरम्यान 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी स्वप्ना बर्मन मात्र नंदिनीच्या कामगिरीवर आनंदी नव्हती आणि तिने काही शंका उपस्थित केल्या. 


स्वप्नाने ब्रिजला सांगितले की, "ट्रान्सजेंडर अॅथलिट्स, ज्यांच्यात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण 2.5 पेक्षा जास्त आहे, ते 200 मीटरहून अधिक स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. कोणतीही मुलगी हेप्टाथलॉनमध्ये इतक्या वेगाने धावू शकत नाही. मी 13 वर्षे यासाठी प्रशिक्षण घेतलं असून हे अशक्य आहे. चार महिन्यात ती प्रशिक्षण घेत ती या स्तरावर पोहोचते हे कसं काय शक्य आहे".


दरम्यान स्वप्ना बर्मनच्या या विधानावर अनेकांनी नाराजी जाहीर केली आहे. सोशल मीडियावर अनेकजण यावर व्यक्त झाले आहेत. 


दरम्यान दुसरीकडे नंदिनीने कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय सरकारचे आभार मानले.  "भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशन आणि भारत सरकारने मला दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले आहे. या पदकासाठी मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे, विशेषतः भारत सरकारचे मी आभार मानते. धन्यवाद. तुम्ही प्रत्येकाने मला पाठिंबा दिला,” अशा भावना तिने पदक जिंकल्यानंतर व्यक्त केल्या.