याला म्हणतात खरं देशप्रेम! नीरज चोप्रा स्वत: धडपडला पण तिरंग्याला...; पाहा Video
Asian Games Neeraj Chopra Video: नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत एशियन गेम्समध्ये सुवर्णपदावर नाव कोरलं. त्यानंतर घडलेला हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
Asian Games Neeraj Chopra Video: चीनच्या हांझोउमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समधील (Asian Games 2023) भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. चौथ्या फेरीमध्ये 88.88 मीटरपर्यंत भाला फेकत नीरजने सुवर्ण कामगिरी केली. भारताच्याच किशोर जेनाने या प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकलं. या विजयानंतरचा मैदानामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी नीरज चोप्राचं कौतुक केलं आहे. पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांकडून शुभेच्छा स्वीकारताना हा प्रकार घडला.
नेमकं घडलं काय?
ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रा चाहत्यांना अभिवादन करत होता. त्याचवेळेस एका चाहत्याने अचानक नीरजच्या दिशेने भारताचा राष्ट्रध्वज भिरकावला. सामान्यपणे पदक जिंकल्यानंतर मैदानाला फेरी मारुन आनंद व्यक्त करताना खेळाडू आपल्या देशाचा झेंडा हातात घेऊन सेलिब्रेशन करतात. यासाठीच या चाहत्याने नीरजकडे तिरंगा भिरकावला. मात्र या प्रेक्षकाने भिरकावलेला तिरंगा नीजरपर्यंत पोहोचला नाही. हा झेंडा नीरजपर्यंत पोहचण्याच्या आधीच जमीनीवर पडणार की काय असं वाटत होतं. मात्र त्यापूर्वीच तडफडत नीरज झेंड्यापर्यंत पोहोचला आणि त्याने जमीनीला स्पर्श होण्याआधी झेंडा हातात पकडला.
अनेकांनी केलं कौतुक
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नीरजचं कौतुक केलं आहे. नीरजने देशाच्या राष्ट्रध्वजचा अपमान होणार नाही यासाठी अगदी धडपडेपर्यंत प्रयत्न केल्याचं पाहून समाधान वाटलं असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने याला म्हणतात खरं देशप्रेम अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. "त्याला गोल्डन कलर आवडतो पण त्याहून अधिक तिरंगा आवडतो," अशा कॅप्शनसहीत नीरजचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तुम्हीच पाहा व्हायरल होत असलेला व्हिडीओ...
ऑगस्टमध्येही घडलाय असाच एक प्रकार जेव्हा...
ऑपिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदावर नाव कोरणारा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने अशाप्रकारे भारतीय झेंड्याचा सन्मान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 मध्ये (World Athletics Championships) सुवर्णपदक जिंकल्यानंतरही असाच प्रकार घडला होता. हंगेरीमधील बुडापेस्ट येथील स्पर्धेत जेतेपद मिळवल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. मैदानामध्येही अनेक चाहत्यांनी त्याच्याबरोबर फोटो काढले. त्याच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. हिंदी भाषेत उत्तमपणे संवाद साधू शकणारी एक हंगेरीयन महिलाही या चाहत्यांमध्ये होती. ही महिला नीरज जवळ आली आणि तिने नीरजकडे ऑटोग्राफ मागितला. नीरजने ऑटोग्राफ देण्यास होकार दिला. मात्र त्यानंतर त्याला समजलं की ही महिला भारतीय राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी मागत आहे. "वहा नही साईन कर सकता" असं नीरजने या चाहतीला अगदी प्रेमाने सांगितलं. अखेर त्या महिलेने तिने परिधान केलेल्या जर्सीच्या उजव्या बाहीवर नीरजची स्वाक्षरी घेतली. नीरजला भेटता आल्याने आणि त्याने स्वाक्षरी दिल्याने ही चाहती भलतीच खूश होती.
मैदानात आणि मैदानाबाहेरही मनं जिंकली
नीरजच्या अशाच एका कृतीचा प्रयत्य आता पुन्हा एकदा आला आहे. नीरजवर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरज हा मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्याच्या वागण्याने चाहत्यांचं मन जिंकत आहे, असं अनेकांनी म्हटलं आहे.