Asia Cup 2023: बाबर-रिझवान विसरा, टीम इंडियाला धोका `पाकिस्तानी चाचा`पासून...
Asia Cup India vs Pakistan : एशिया कप स्पर्धेत करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा धुव्वा उडवत दमदार सुरुवात केली आहे. या सामन्यात पाकिस्तानी चाचा नावाने ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजाने तुफान फटकेबाजी केली.
Asia Cup India vs Pakistan : एशिया कप 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यजमान पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंकेने (Sri Lanka) पहिले सामने जिंकत दमदार सुरुवात केली आहे. 30 ऑगस्टला खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळ (Nepal) संघाचा अक्षरश: धुव्वा उडवला. फलंदाजी आणि गोलंदाजीतही पाकिस्तान संघ चांगलाच तयार असल्याचं या सामन्यात दिसलं. कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि इफ्तिकार अहमदने (Iftikar Ahmed) दमदार शतक केलं. तर शाहिन शाह, मोहम्द रौफ या वेगवान गोलंदाजासह स्पिनरही फॉर्मात दिसले. नेपाळचा संपूर्ण संघ अवघ्या 104 धावांवर आटोपला. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात तब्बल 238 धावांना बलाढ्य विजय मिळवला.
इफ्तिखार अहमदचा झंझावत
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने या सामन्यात 151 धावांची ऐतिहासीक खेळी केली. पण क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं ते सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इफ्तिकार अहमदने. इफ्तिकारच्या झंझावातासमोर नेपाळी गोलंदाजांची पिसं निघाली. इफ्तिकारने अवघ्या 71 चेंडूत 109 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने 11 चौकार आणि चार षटकार मारले. या सामन्यात इफ्तिकारचा स्ट्राईक रेट होता. तब्बल 153.52 चा. इफ्तिकार एकदिवसीय नाही तर टी20 सामन्यात फलंदाजी करत असल्यासारखा त्याचा झंझावत होता.
टीम इंडियासाठी धोका
पाकिस्तानचा दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडियाशी (Team India) आहे. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान नेहमीच जोमाने खेळतात. पण इफ्तिकारचा फॉर्म पहाता टीम इंडियाला बाबर-रिझवान जोडीपेक्षा इफ्तिकार अहमदचा सर्वात जास्त धोका असल्याचं वाटतंय. इफ्तिकार खेळपट्टीवर उभा राहिला तर एकहाती सामना जिंकून देण्याची ताकद त्याच्यात आहे.
पाकिस्तानी चाचा नावाने प्रसिद्ध
इफ्तिकार अहमद सध्या 32 वर्षांचा आहे. पण त्याचा फिटनेस एका तरुण खेळाडूलाही लाजवेल असा आहे. पाकिस्तानात इफ्तिकार पाकिस्तानी चाचा म्हणून प्रसिद्ध आहे.
इफ्तिकारची क्रिकेट कारकिर्द
इफ्तिकारने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 68 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. यात त्याने 1277 धावा केल्या आहेत. तर 1 शतक आणि पाच अर्धशतकं त्याच्या नावावर जमा आहेत. गोलंदाजीतही इफ्तिकारने 13 विकेट घेतल्या आहेत. 40 धावाच पाच विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. एशिया कप स्पर्धेत इफ्तिकार 15 सामने खेळला असून यात त्याने 402 धावा केल्या आहेत.