IPL 2022: कर्णधारपद गेल्याचा विराटला फटका; फलंदाजीसाठी कधी उतरायचं?
आता टीमची कमान फाफ ड्यू प्लेसिसकडे सोपवण्यात आली आहे. पण आता एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे टीमच्या फलंदाजीचा क्रम.
मुंबई : आयपीएलची सर्वात अनलकी टीम म्हणजे रॉयल चॅलेंजर बंगळूरू. यंदाच्या 15 व्या सिझनमध्ये ही टीम नव्या कर्णधारासह मैदानावर उतरणार आहे. गेल्या सिझनमध्ये विराट कोहली स्वतः या टीमच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्यानंतर आता टीमची कमान फाफ ड्यू प्लेसिसकडे सोपवण्यात आली आहे. पण आता एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे टीमच्या फलंदाजीचा क्रम.
नेहमीप्रमाणे रॉयल चॅलेंजर बंगळूरूमध्ये पुन्हा एकदा मॅनेजमेंट फलंदाजी क्रमवारीसंदर्भात संभ्रमात आहे. त्याचप्रमाणे माजी कर्णधार विराट कोहली कोणत्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरणार यावरही प्रश्नचिन्ह आहे. तो पुन्हा ओपनिंगला उतरणार का हा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे
पॉवरप्लेमध्ये विराटचा रेकॉर्ड पाहिला तर त्याने गेल्या तीन सिझनमघ्ये 130.16 च्या स्ट्राइक रेटने सहा ओव्हरपर्यंत रन्स केले. गेल्या तीन सिझनमध्ये कोहलीचा मधल्या ओव्हर्समध्ये स्ट्राइक रेट 110.16 आहे. स्पिनविरुद्ध त्याला वेगाने रन्स काढता आले नाहीत. अशा परिस्थितीत कोहली सलामीवीर म्हणून गेल्या तीन वर्षांत अधिक यशस्वी ठरलाय असं म्हणता येईल.
यंदाच्या सिझनमध्ये कोहली ओपनिंगला उतरला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मधल्या फळीत इतर खेळाडूंना खेळवण्याची संधी मिळेल. विराट आणि फाफ डू प्लेसिस हे दोघं जणं टीमला चांगली ओपनिंग करून देऊ शकतात.
यानंतर फलंदाजीमध्ये युवा खेळाडू अनुज रावत याला संधी मिळू शकते. तर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर उतरू शकतात.