AUS vs IND 2024-25 Border Gavaskar Trophy: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळण्यासाठी 'करो या मरो' समजली जाणारी ऑस्ट्रेलियामधील सिडनी कसोटी आजपासून सुरु झाली आहे. या कसोटीमधून भारताने कर्णधार रोहित शर्मालाच वगळलं आहे. बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमधील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीमध्ये रोहित शर्माला वगळण्यात आलं आहे. सुरु असलेल्या अंतरराष्ट्रीय कसोटी मालिकेमधून भारताने अशाप्रकारे कर्णधाराला वगळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीमध्ये पर्थच्या मैदानात भारताला विजय मिळवून देणाऱ्या जसप्रीत बुमराहकडे शेवटच्या कसोटीचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. मात्र रोहित शर्माला अचानक का संघाबाहेर काढण्यात आलं याबद्दल चर्चा सुरु आहेत.


वर्षभरानंतर या खेळाडूचं पुनरागमन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर बुमराहने रोहित शर्माला का बसवण्यात आलं आहे याबद्दलची माहिती दिली. रोहित शर्माने स्वत: संघाबाहेर बसण्याचा निर्णय घेतल्याचं बुमराहने सांगितलं. संघ म्हणून खेळताना कोणीही स्वार्थी विचार करत नाही. संघासाठी जे सर्वोत्तम ठरेल तसा निर्णय एकत्रितपणे घेतला जातो. या सामन्यामध्ये प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान देण्यात आलं आहे. प्रसिद्ध कृष्णा जवळपास वर्षभरानंतर अंतरराष्ट्रीय स्तरावरील कसोटी क्रिकेट खेळत आहे. तो यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये शेवटची कसोटी खेळला होता. हा प्रसिद्ध कृष्णाचा तिसरा अंतरराष्ट्रीय कसोटी सामना ठरला आहे.


...म्हणून रोहित बाहेर


"आम्ही या मालिकेमध्ये चांगलं क्रिकेट खेळलो आहोत. या शेवटच्या सामन्याबद्दलही फार उत्सुकता आहे. आम्ही चांगली कामगिरी करु अशी अपेक्षा आहे. खेळपट्टीवर गवत दिसत आहे. नव्या चेंडूमुळे नक्कीच फरक पडेल पण एकंदरित खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम दिसत आहे. आमच्या कर्णधाराने कणखर नेत्तृत्व दाखवत स्वत:ला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तो या सामन्यासाठी विश्रांती घेत आहे. यामधून संघात किती एकता आहे हे दिसून येतं. इथे स्वार्थीपणे कोणीच वागत नाही. संघासाठी जे काही चांगलं असेल तसा निर्णय घेतला जातो. संघात दोन बदल आहेत. रोहित शर्माने विश्रांतीचा निर्णय घेतला आहे. आकाश दीप जखमी असल्याने त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा खेळत आहे," असं बुमराहने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितलं.



प्लेइंग इलेव्हन: 


ऑस्ट्रेलिया : सॅम कोन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.


भारत: यशस्वी जयसवाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.