Iceland Cricket On Mohammad Hafeez : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव करत सलग दुसरा सामना जिंकून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर विजय निश्चित केला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात दारुण पराभव पत्करल्यानंतर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तान संघाचा पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि सध्याचा संघ प्रशिक्षक मोहम्मद हाफीजने केलेल्या वक्तव्याने आइसलँड क्रिकेटने त्यांची खिल्ली उडवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी मोहम्मद रिझवानच्या विकेटवरुन मोठा गोंधळ झाला. या विकेटनंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक मोहम्मद हाफिजने अंपायरिंग आणि तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित केले होते. ऑस्ट्रेलियापेक्षा पाकिस्तान चांगला खेळला, असे म्हणत त्याने आपल्या संघाचा बचावही केला. आता या विधानावरून हाफिजला प्रचंड ट्रोल केले जात आहे. पॅट कमिन्सने त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर आता आइसलँड क्रिकेटनेही हाफिजला ट्रोल केले आहे. 


"मी ऑस्ट्रेलियाचे मालिका विजयाबद्दल निश्चितपणे अभिनंदन करू इच्छितो. ते चांगले क्रिकेट खेळले. पण एक संघ म्हणून मला खरोखरच अभिमान वाटतो की पाकिस्तान संघाने मोठे धाडस दाखवले. खेळ जिंकण्यासाठी मोठ्या उत्कटतेने खेळलो आणि मला त्यांचा खरोखर अभिमान आहे,"असे मोहम्मद हाफिजने म्हटलं आहे. हाफिजने संघाच्या धाडसाचे आणि जिद्दीचे कौतुक केले होते. आपल्या संघातून चूक झाल्याचे त्याने मान्य केले असले तरी आपल्या संघावर विश्वास व्यक्त केला. आइसलँड क्रिकेटने हाफिजच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे.


हाफिजच्या वक्तव्याला उत्तर देताना आइसलँड क्रिकेटने पाकिस्तानला सलग 16 पराभवांची आठवण करून दिली. आइसलँड क्रिकेटने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली. "हे आश्चर्यकारक आहे. एक अतिशय प्रतिभावान आणि चांगला संघ ऑस्ट्रेलियात सलग 16 सामने कसे गमावू शकतो. वरवर पाहता भाग्यवान ऑस्ट्रेलियन लवकरच भाग्यवान होण्यापासून थांबेल," असे आइसलँड क्रिकेटने म्हटलं आहे.



नेमकं काय घडलं?


पाकिस्तानला 317 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 98 धावांची गरज होती तेव्हा सगळा वाद घडला. त्यावेळी पाकिस्तानच्या पाच विकेट शिल्लक होत्या. पॅट कमिन्सने 61 व्या ओव्हीचा चौथा चेंडू टाकला तेव्हा तो उसळला. रिझवानने तो टाळण्याचा प्रयत्न केला. पण तो त्याच्या ग्लोव्हजजवळ गेला आणि मागे अॅलेक्स कॅरीकडे गेला. यानंतर अपील झाल्यानंतरही ग्राउंड अंपायर मायकेल गॉफ यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आवाहनाशी सहमत नसल्याचे सांगितले. यानंतर ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला.


थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी हॉटस्पॉट आणि रिअल टाईम स्निकोचा वापर करुन पाहिले तर चेंडू रिझवानच्या मनगटाच्या पट्टीला स्पर्श केला असल्याचे वाटले. त्यामुळे त्याने मैदानावरील पंचांचा निर्णय झुगारून रिझवानला बाद घोषित केले. रिझवान बाद झाल्यानंतर 18 धावांत पाकिस्तानने शेवटच्या पाच विकेट गमावल्या. अशातच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.