`Overconfidence तुम्हाला...`; वर्ल्ड कप फायलननंतर भारतीय खेळाडूंवर शाहीद आफ्रिदीची टीका
Shahid Afridi On World Cup 2023 Finals Australia Beat India: एका वृत्तवाहिनीवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या वर्ल्ड कप 2023 मधील फायनल सामन्याचं विश्लेषण करताना आफ्रिदीने केलं हे विधान
Shahid Afridi On World Cup 2023 Finals Australia Beat India: वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 10 सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाने रविवारी सर्वात महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक अशा अंतिम सामन्यात कच खाल्ली. वर्ल्ड कप विजयाचे प्रमुख दावेदार म्हणून अगदी स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंची वैयक्तिक स्तरावर दामदार कामगिरी करत भारताला फायलनपर्यंत पोहोचवलं पण शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 3 विकेट्सने पराभूत केलं. भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने कठोर शब्दांमध्ये भारतीय संघाला लक्ष्य केलं आहे.
भारतीय फलंदाजांवर केली टीका
पाकिस्तानमधील 'समा टीव्ही' या वृत्तवाहिनीवरील एका चर्चा सत्रात सहभागी झालेल्या शाहीद आफ्रिदीने वर्ल्ड कप 2023 च्या फायलनबद्दल भाष्य केलं. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. शुभमन गिल स्वस्तात तंबूत परतला. शुभमन 4 धावा करुन बाद झाल्यानंतरही रोहित शर्माने त्याची स्फोटक फलंदाजी सुरु ठेवली. रोहितने 47 धावा अवघ्या 31 बॉलमध्ये केल्या. मात्र ग्लेन मॅक्सवेलला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला. पुढच्या 4 बॉलमध्येच श्रेयस अय्यरही बाद झाल्याने भारतीय संघाचे 3 गडी तंबूत परतले. चौथ्या विकेटसाठी विराट कोहली आणि के. एल. राहुल यांनी 18.3 ओव्हरमध्ये 67 धावांची पार्टनरशीप केली. विराट अर्धशतक झळकावून बाद झाला. त्यानंतर के. एल. राहुल तंबूत परतला आणि भारताची सामन्यावरील पकड सुटली. सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात विशेष चमक दाखवता आली नाही. तळाचे फलंदाज कुलदीप यादव आणि सिराज यांनी तळाशी फलंदाजी करताना काही फटकेबाजी केल्याने भारताचा स्कोअर 240 पर्यंत पोहोचला. भारतीय फलंदाजांच्या याच सुमार कामगिरीचा समाचार शाहीद आफ्रिदीने घेतला आहे.
हेच मारक ठरलं
श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावल्याचा संदर्भ देत शाहीद आफ्रिदीने भारतीय फलंदाजीचं विश्लेषण केलं आहे. "जेव्हा तुम्ही सतत सामने जिंकत असता तेव्हा तुम्हाला अतिआत्मविश्वास (ओव्हरकॉन्फिडन्स) वाटू लागतो. हाच ओव्हरकॉन्फिडन्स तुमच्यासाठी मारक ठरते," असं आफ्रिदीने भारतीय फलंदाजीबद्दल मत व्यक्त करताना म्हटलं.
192 धावांची पार्टनरशीप
भारतीय गोलंदाजांनी उत्तम सुरुवात केली. 47 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 3 गडी तंबूत परतले होते. ऑस्ट्रेलियाला ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबूशेन यांच्या 192 धावांच्या पार्टनरशीपने पाहुण्या संघाला 6 व्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मदत केली. हेडने शतक झळकावत वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा 7 वा खेळाडू होण्याचा मान मिळवला. भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघ 6 व्यांदा विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, अॅशेज आणि टी-20 वर्ल्ड कपही जिंकला आहे.