सिडनी : न्यूझीलंडचा टेस्ट सीरिजमध्ये ३-०ने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि भारतात ३ वनडे मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम ज्याचा उल्लेख हिरा असा करत आहे, त्याला संधी मिळणार आहे. मार्नस लॅबुशेन हा कठीण दिवसात ऑस्ट्रेलियाला सापडलेला हिरा आहे, असं प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाची २०१९ या वर्षाची सुरुवात खराब झाली. वर्षाच्या सुरुवातीलाच भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत टेस्ट सीरिजमध्ये २-१ असा पराभव केला. पण जसं वर्ष पुढे सरकलं तशी ऑस्ट्रेलियाची कामगिरी सुधारली. टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये ऍशेस सीरिज ड्रॉ केली. यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाने व्हाईट वॉश केलं. आता ऑस्ट्रेलिया भारतात येणार आहे.


टेस्ट क्रिकेटमधल्या ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीचं श्रेय मार्नस लॅबुशेनला जातं. २५ वर्षांच्या लॅबुशेनने २०१९ या वर्षात टेस्टमध्ये सर्वाधिक रन केले. मागच्या ५ मॅचमध्ये मार्नस लॅबुशेनने ८९६ रन केले आहेत. या कामगिरीमुळे लॅबुशेनची ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीममध्येही निवड झाली आहे. लॅबुशेनने आतापर्यंत १४ टेस्ट खेळल्या आहेत, पण त्याला वनडेमध्ये अजून संधी मिळालेली नाही.


ज्यावेळी डेव्हिड वॉर्नर आणि स्मिथवर बंदी घालण्यात आली होती, तेव्हा आम्हाला एका चांगल्या बॅट्समनची गरज होती. कठीण काळ असताना आम्ही लॅबुशेनला संधी दिली. लॅबुशेननेही या संधीचं सोनं केलं. ऑस्ट्रेलियाचं पुनरागमन करण्यात लॅबुशेनची भूमिका महत्त्वाची आहे, असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन म्हणाला आहे.