पर्थ : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पर्थमध्ये डे-नाईट टेस्ट मॅच सुरु आहे. या टेस्ट मॅचला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. लॉकी फर्ग्युसन आणि जॉस हेजलवूड यांच्यानंतर आता तिसऱ्या दिवसाचा खेळ संपायच्या आधी अंपायर अलीम दार यांनाही दुखापत झाली. अंपायर अलीम दार यांना बॉल लागल्यामुळे ते मैदानातच पडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगवेळी जो बर्न्स एक रन घेण्यासाठी धावला असताना उलटा फिरला. तेव्हा फिल्डिंग करणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूने स्टम्पवर डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल स्टम्पला लागण्याऐवजी अलीम दार यांना लागला. बॉल लागल्यामुळे अलीम दार मैदानातच कोसळले. पण फिजियो मैदानात आले आणि त्यांनी अलीम दार यांच्यावर प्रथमोपचार केले.



अलीम दार यांनी याच टेस्ट मॅचमध्ये विक्रमाला गवसणी घातली आहे. सर्वाधिक टेस्ट मॅचमध्ये अंपायरची भूमिका निभावल्याचा विक्रम दार यांच्या नावावर झाला आहे. अलीम दार यांची अंपायर म्हणून ही १२९वी टेस्ट मॅच आहे. याआधी वेस्ट इंडिजच्या स्टीव्ह बकनर यांच्या नावावर हा विक्रम होता. ५१ वर्षांच्या अलीम दार यांनी २००३ साली ढाक्यामध्ये इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातल्या टेस्ट मॅचमधून पदार्पण केलं होतं.


या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा फास्ट बॉलर लॉकी फर्ग्युसनला दुखापत झाली. या दुखापतीमुळे फर्ग्युसन उरलेली टेस्ट मॅच खेळू शकणार नाही. लॉकी फर्ग्युसनने मॅचमध्ये फक्त ११ ओव्हर टाकल्या. लॉकी फर्ग्युसनच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे.


फर्ग्युसननंतर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जॉस हेजलवूडलाही दुखापत झाली. हेजलवूडने तर फक्त ८ बॉलच टाकले होते. हेजलवूड आणि फर्ग्युसन हे दोघंही आता उरलेली टेस्ट मॅच खेळू शकणार नाहीत, त्यामुळे दोन्ही टीम १० खेळाडू घेऊनच खेळत आहेत.


ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये डे-नाईट टेस्ट मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये ४१६ रन केल्यानंतर न्यूझीलंडचा १६६ रनवर ऑल आऊट झाला, यामुळे ऑस्ट्रेलियाला २५० रनची आघाडी मिळाली. फास्ट बॉलर मिचेल स्टार्कने ९२ रन देऊन ५ विकेट घेतल्या, तर नॅथन लायनला २ आणि हेजलवूड-कमिन्सला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.