विराटकडून काहीतरी शिका, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांचा संघाला सल्ला
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने मेलबर्न येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दणक्यात विजय झाला.
मुंबई : India vs Australia. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने मेलबर्न येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दणक्यात विजय झाला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाची खेळी पाहता संघाचे फलंदाची प्रशिक्षक ग्रीम हिक यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. संघाला कसं खेळतं ठेवायचं, याविषयी खेळाडूंनी भारतीय कर्णधार विराट कोहली याच्याकडून शिकलं पाहिजे असं सूचक विधान त्यांनी केलं.
चार कसोटी सामन्यांच्या मालिकाेमधील तिसऱ्या कसोटीसामन्यातील विराटच्या खेळीचं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं. २०४ चेंडूंचा सामना करणाऱ्या विराटने कशा प्रकारे ८२ धावा केल्या होत्या याचं उदाहरण देत त्यांनी आपल्या संधातील खेळाडूंनी त्याच्याकडून शिकावं, असं ते म्हणाले. 'एसईएन' रेडिओशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
'विराटने कशा प्रकारे संघाची धावसंख्या पुढे नेली याविषयी आम्ही बोलत होतो. चेतेश्नर पुजारा, विराट जे त्यांच्या आक्रमक खेळासाठी ओळखले जातात त्यांनी २६-२६ चेंडूंचा सामना करत २० धावा केल्या आणि हळूहळू त्यांनी आपली धावसंख्या पुढे नेण्यावर भर दिला', असं ते म्हणाले.
कोणत्याही खेळाडूला संघाचा डाव आणि स्थिती नीट लक्षात घेऊन त्या हिशोबानेच आपल्या खेळात बदल करण्याचं कौशल्य अवगत असलं पाहिजे ज्यासाठी प्रचंड शिस्त असण्याची गरज असते. सोबतच स्वत:वर ताबा असणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं म्हणत या साऱ्याकता प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
एक फलंदाज म्हणून विराट मैदानात जितका प्रभावीपणे वावरतो तितक्याच आत्मविश्वासाने तो एक कर्णधार म्हणूनही संघाची साथ देत असतो. हाच गुण खऱ्या अर्थाने त्याला सर्वार्थाने लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवतो असंच म्हणावं लागेल.