गौतम गंभीर `दहशतवादी`, ऑस्ट्रेलियाचा पत्रकार बरळला
आयपीएलमधल्या खराब कामगिरीमुळे दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरनं त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
नवी दिल्ली : आयपीएलमधल्या खराब कामगिरीमुळे दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरनं त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तसंच आयपीएलमध्ये त्याला मिळणारं मानधनही गंभीरनं नाकारलं आहे. असं असतानाच गंभीरनं पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमारेषेच्या उल्लंघनाबाबत आणि पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट संबंधांबाबत भाष्य केलं आहे. पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर फक्त क्रिकेटवर बंदी घालून होणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधले संबंध सुधारायचे असतील तर एवढंच पाऊल पुरेसं नाही. गौतम गंभीरच्या या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचा पत्रकार बरळला आहे. गौतम गंभीर हा बोलणारा दहशतवादी असल्याची मुक्ताफळं या पत्रकारानं उधळली आहेत. ऑस्ट्रेलियाचा पत्रकार डेनिस फ्रीडमॅननं केलेल्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे.
काय म्हणाला गंभीर?
पाकिस्तानसोबत संबंध सुधारायचे असतील तर सगळ्या सेक्टरमध्ये बंदी घालण्यात यावी. संगीत आणि चित्रपटसृष्टीचाही यात समावेश व्हावा. जोपर्यंत संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला कोणतीही संधी देता कामा नये, असं गंभीर म्हणाला होता. सीमारेषेच्या उल्लंघनाला भारतानं आणखी चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आपण प्रत्येक वेळी पाकिस्तानशी चर्चा केली आहे. पण याचा काहीही परिणाम झालेला नाही. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात. पहिल्यांदा बातचित हाच मार्ग असतो पण त्यानंतरही समस्या सुटत नसेल तर कडक पावलं उचलावी लागतात. त्यामुळे याबाबतीत कोणतंही राजकारण होऊ नये, अशी प्रतिक्रिया गंभीरनं दिली आहे.