ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचं रेकॉर्ड, ६ बॉलमध्ये घेतल्या ४ विकेट
पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये स्पिनरना अनुकूल खेळपट्टी बनवणं चांगलंच महागात पडलं आहे.
अबू धाबी : पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये स्पिनरना अनुकूल खेळपट्टी बनवणं चांगलंच महागात पडलं आहे. मॅचच्या पहिल्याच दिवशी लायननं पाकिस्तानच्या ५ विकेट घेतल्या. या मॅचमध्ये पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर १७ ओव्हरमध्ये एक विकेट गमावून पाकिस्ताननं ५० रन केले होते. तेव्हा पाकिस्तान मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल, असं वाटत होतं. पण लायननं त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकलं.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेननं १४ व्या ओव्हरला लायनच्या हातात बॉल दिला. यानंतर ३० वर्षांच्या लायननं पहिल्या तिन्ही ओव्हर मेडन टाकल्या. मग २०व्या ओव्हरपासून लायननं विकेट घ्यायला सुरुवात केली. लायननं पहिले अजहर अलीला (१५ रन) आऊट केलं. यानंतर दुसऱ्या बॉलवर लायननं हॅरिस सोहेलची विकेट घेतली. सोहेल खान पहिल्याच बॉलवर आऊट झाला.
हॅट्रिकची संधी हुकली
चौथ्या ओव्हरच्या पाचव्या आणि सहाव्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर लायनला पुढच्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घ्यायची संधी होती. पण असद शफीकनं लायनला हॅट्रिक घेऊन दिली नाही. पण नॅथन लायननं असद शफीक आणि बाबर आजम यांना शून्य रनवरच आऊट केलं. या मॅचमध्ये पाकिस्तानचा स्कोअर ५७ रनवर एक विकेट होता पण १० मिनिटांमध्येच हा स्कोअर ५७ रनवर ५ विकेट असा झाला. एकही रन न देता लायननं ६ बॉलमध्ये पाकिस्तानच्या ४ विकेट घेतल्या.
ब्रेट ली, जॉनसनच्या पुढे गेला लायन
६ बॉलमध्ये ४ विकेट घेतल्यानंतर नॅथन लायन ब्रेट ली आणि मिचेल जॉनसनच्या पुढे गेला आहे. लायननं ८० टेस्टमध्ये ३१४ विकेट घेतल्या आहेत. ब्रेट लीनं ७६ टेस्टमध्ये ३१० तर मिचेल जॉनसननं ७३ मॅचमध्ये ३१३ विकेट घेतल्या होत्या. लायन आता ऑस्ट्रेलियाचा चौथा यशस्वी बॉलर बनला आहे. लायनच्या पुढे शेन वॉर्न (७०८ विकेट), ग्लेन मॅकग्रा (५६३ विकेट), डेनील लिली (३५५ विकेट) आहेत.