मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर चौफेर टीका होत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आयसीसीनं ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथवर एका मॅचची बंदी आणली आहे. तर क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही स्मिथ आणि वॉर्नरवर कारवाईचा बडगा उगारला आहे. स्मिथ-वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आल्याची माहिती इंग्लंडमधल्या वृत्तपत्रांनी दिली आहे.


ऑस्ट्रेलियन्स स्मिथवर भडकले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या प्रकारानंतर ऑस्ट्रेलियामध्ये संतापाची लाट आहे. या वादामध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनीही हस्तक्षेप करावा लागला आहे. एक आदर्श टीम अशाप्रकारे धोका देऊ शकते, यावर माझा विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया टर्नबुल यांनी दिली आहे.


देशाच्या पंतप्रधानाला क्रिकेटच्या या वादामध्ये हस्तक्षेप करण्याची ही पहिलीच वेळ असेल. कॅप्टन आणि दोषी खेळाडूंवर कारवाई करण्याची मागणीही पंतप्रधानांनी केली आहे.


पंतप्रधानांआधी ऑस्ट्रेलियाला मिळाला होता कर्णधार


ऑस्ट्रेलियाला त्यांचा पहिला पंतप्रधान १९०१ साली मिळाला होता. सर अॅडमंट बार्टन हे ऑस्ट्रेलियाचे पहिले कॅप्टन होते. तर ऑस्ट्रेलियाची पहिली क्रिकेट टीम १८७७मध्येच बनली होती. म्हणजेच ऑस्ट्रेलियाला पहिला पंतप्रधान मिळण्याच्या २४ वर्ष आधीपासूनच क्रिकेटची टीम मिळाली होती.


पंतप्रधानांनंतर कॅप्टन मोठं पद


पंतप्रधानांनंतर कॅप्टन हे दुसरं सगळ्यात मोठं पद आहे, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन म्हणाला होता. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन हा फक्त पंतप्रधानांच्या मागे आहे, त्यामुळे कॅप्टननं नेहमीच चांगंल खेळलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया लेहमननं दिली होती.


ऑस्ट्रेलियानं दिले सर्वात यशस्वी कॅप्टन


वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग हा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. पॉटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियानं २००३ आणि २००७ सालचा वर्ल्ड कप जिंकला. पॉटिंगनं कॅप्टन असताना ऑस्ट्रेलियानं २३० वनडेपैकी १६५ वनडेमध्ये विजय मिळवला आहे.


रिकी पॉटिंग वनडे क्रिकेटमध्ये १५० पेक्षा जास्त मॅच जिंकवणारा एकमेव कॅप्टन आहे. पॉटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया ७६ टक्के मॅच जिंकली आहे. ९० च्या दशकामध्ये अॅलन बॉर्डरनंही टीमला नव्या उंचीवर पोहोचवलं. बॉर्डरनं १७८ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं, यातल्या १०७ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. बॉर्डर १०० वनडे मॅच जिंकणारा पहिला कॅप्टन होता. बॉर्डर कॅप्टन असताना ऑस्ट्रेलिया ६१ टक्के मॅच जिंकली होती.