अबू धाबी : पाकिस्तान क्रिकेट टीमचे खेळाडू त्यांच्या मैदानातल्या अतरंगी गोंधळामुळे नेहमीच चर्चेत असतात. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियातल्या मॅचवेळीही मैदानामध्येच अशी विचित्र घटना घडली. यामध्ये पाकिस्तानचा बॅट्समन अजहर अली शॉट मारून रन काढण्याऐवजी त्याच्या सहकाऱ्यासोबत गप्पा मारत बसला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या विकेट कीपरनं अजहर अलीला रन आऊट केलं. अजहर अलीच्या ही गोष्ट लक्षातही आली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी पाकिस्तानचा स्कोअर ५२.२ ओव्हरमध्ये ३ विकेटवर १६० रन एवढा होता. अजहर अलीनं पीटर सीडलच्या बॉलिंगवर बॉल पॉईंट आणि गलीच्या दिशेनं मारला. बॉल बाऊंड्री लाईनच्या जवळ गेला पण बॉलनं बाऊंड्री लाईनला स्पर्श केला नाही. अजहर अलीचा बॉल बाऊंड्री लाईनला स्पर्श केल्याचा समज झाला. त्यामुळे अजहर अली रन काढताना मध्येच थांबला आणि असद शफीकशी गप्पा मारत बसला.


ऑस्ट्रेलियाचा फिल्डर मिचेल स्टार्क बॉल घेण्यासाठी धावला आणि त्यानं बॉल विकेट कीपर टीम पेनकडे फेकला. टीम पेननंही क्षणाचाही अवधी न घालवता बॉल स्टम्पवर मारला. यामुळे अजहर अली रन आऊट झाला. जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या टीमनं जल्लोष सुरू केला तेव्हा अजहर अलीच्या ही गोष्ट लक्षात आली. अजहर अली ६४ रनवर आऊट झाला.


३३ वर्षांचा अजहर अली पाकिस्तानचा सगळ्यात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. अजहर अलीनं ६७ टेस्टमध्ये ५,३०३ रन केले आहेत. यामध्ये १४ शतकं आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे.