अजहरुद्दीनचा मुलगा क्रिकेटमध्ये, गोव्याकडून रणजी खेळणार
सचिन आणि द्रविडच्या मुलानंतर आता....
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर श्रीलंकेविरुद्धच्या यूथ अंडर-१९ टेस्टमध्ये खेळला. सचिनबरोबरच द्रविडचा मुलगाही शालेय क्रिकेटमध्ये खेळत आहे. सचिन आणि द्रविडनंतर आता मोहम्मद अजहरुद्दीनचा मुलगाही रणजी ट्रॉफी स्पर्धेतून पदार्पण करू शकतो. अजहरुद्दीनचा मुलगा असदुद्दीन गोव्याकडून रणजी ट्रॉफीचा हा मोसम खेळण्याची शक्यता आहे. असदुद्दीननं यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधला आहे. बोर्डानंही असदुद्दीनला रणजी टीममध्ये निवड करण्याचा भरवसा दिला आहे.
२८ वर्षांचा असदुद्दीन अनेक वर्षांपासून हैदराबादच्या रणजी टीममध्ये खेळण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण त्याला टीममध्ये जागा मिळाली नाही. असदुद्दीननं आयपीएलमध्ये खेळण्यासाठीही प्रयत्न केले पण तिकडेही त्याला निराशा आली. संधी मिळत नसल्यामुळे निराश न होता आता असदुद्दीननं दुसऱ्या राज्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. असदुद्दीन शेवटचा २००९ साली मोईनुद्दीन गोल्ड कपमध्ये हैदराबादकडून खेळला होता. यानंतर ५ वर्षांनी असदुद्दीन उत्तर प्रदेशला गेला पण तिथेही त्याला संधी मिळाली नाही.
सात वर्षांपूर्वी अजहरुद्दीनच्या मुलाचा मृत्यू
२०१०-११ साली अजहरुद्दीनचा १९ वर्षांचा मुलगा अयाजुद्दीनचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यावेळी अयाजुद्दीन क्रिकेटमध्ये ओळख निर्माण करत होता पण अजहरुद्दीनचं मुलाला क्रिकेटपटू बनवण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं. पण असदुद्दीन आता वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अजहरुद्दीननं खेळल्या ४३३ मॅच
५५ वर्षांचा अजहरुद्दीन भारताचा एक दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक होता. १९८५ ते २००० पर्यंत अजहरनं ९९ टेस्ट आणि ३३४ वनडे मॅच खेळल्या. अजहर भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकीही एक होता. अजहरनं ४७ टेस्ट आणि १७४ वनडेमध्ये भारताचं कर्णधारपद भुषवलं. मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर बीसीसीआयनं अजहरवर आयुष्यभरासाठी बंदी घातली होती. पण सर्वोच्च न्यायालयाकडून अजहरला दिलासा मिळाला होता.