पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला विराटचा विक्रम
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमने शानदार शतक केलं.
कराची : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमने शानदार शतक केलं. या शतकाबरोबरच बाबर आझम विराट कोहलीच्या पुढे गेला आहे. बाबरच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने ५० ओव्हरमध्ये ३०५ रन केले, यानंतर शिनवारीच्या शानदार बॉलिंगमुळे पाकिस्तानचा ६७ रननी विजय झाला.
बाबर आझमचं वनडे कारकिर्दीतलं हे ११वं शतक आहे. सगळ्यात जलद ११ शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बाबर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाबर आझमने ७१व्या इनिंगमध्ये त्याचं वनडे कारकिर्दीतलं ११वं शतक झळकावलं. विराटला ११ शतकं करायला ८२ इनिंग लागल्या होत्या. बाबरच्या पुढे दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला आणि क्विंटन डिकॉक आहे. आमलाने ६४ इनिंगमध्ये आणि क्विंटन डिकॉकने ६५ इनिंगमध्ये ११ शतकं केली होती.
याचबरोबर एका वर्षात सगळ्यात जलद १ हजार रन पूर्ण करणारा बाबर पाकिस्तानचा खेळाडू बनला आहे. याआधी हे रेकॉर्ड जावेद मियांदादच्या नावावर होतं. मियांदादने १९८७ साली २१ इनिंगमध्ये १ हजार रन केले होते. तर बाबर आझमने १९ इनिंगमध्येच १ हजार रन पूर्ण केले.
पाकिस्तानकडून वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानकडून सईद अन्वरने २० शतकं आणि मोहम्मद युसूफने १५ शतकं केली आहेत. तर मोहम्मद हफीजनेही ११ शतकं झळकावली आहेत. एजाज अहमद आणि इंजमाम उल हक यांच्या नावावर प्रत्येकी १०-१० शतकं होती.
श्रीलंकेविरुद्धच्या या सीरिजच्या दुसऱ्या मॅचमध्ये बाबर आझमने ११५ रनची खेळी केली. सीरिजची तिसरी वनडे २ ऑक्टोबरला याच मैदानात खेळवण्यात येणार आहे. सीरिजची पहिली वनडे पावसामुळे रद्द झाली होती. वनडे सीरिजनंतर दोन्ही टीममध्ये ३ टी-२० मॅचची सीरिज होणार आहे.