Babar Azam World Cup 2023: पाकिस्तानसमोर आज करो या मरोची स्थिती असून सेमीफायलनसाठी पात्र होण्याच्या दृष्टीने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला मोठ्या फरकाने इंग्लंडला पराभूत करणं आवश्यक आहे. पाकिस्तानी संघ साखळीफेरीतील अखेरचा सामना नुसता जिंकला तरी तो स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. मात्र साखळीफेरीतील या सामन्याआधीच बाबर आझम पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना एका मोठा देण्याच्या तयारीत चर्चा आहे. बाबर आझम वर्ल्ड कप नंतर पाकिस्तानी संघाचं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत आहे. भारतामधून पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर बाबर आपला हा निर्णय जाहीर करु शकतो, असं पाकिस्तानमधील 'जिओ न्यूज'ने म्हटलं आहे. बाबर आझम सध्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांच्यासहीत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डातील विद्यमान पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत असल्याचं वृत्त आहे. बाबरच्या निकटवर्तीय लोकांशी तो कर्णधारपद सोडण्याबद्दल बोलत असल्याचं सांगण्यात आलं आहे.


अनेकांनी दिला सल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जिओ न्यूज'च्या वृत्तानुसार, बाबर सध्या ज्या व्यक्तींबरोबर कर्णधारपद सोडण्यासंदर्भात चर्चा करत आहे त्यांच्या सल्ल्यानुसारच तो पुढील निर्णय घेण्याची शक्यात आहे. बाबरच्या काही निकटवर्तीयांनी तर त्याला केवळ मर्यादित क्रिकेटमधील नाही तर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिल्याचंही समजतं.


सध्या माझं लक्ष..


इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या साखळीफेरीतील अखेरच्या सामन्याआधी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्येही बाबरला त्यांच्या कर्णधारपदासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. "कर्णधारपदासंदर्भात मी यापूर्वीही बोललो आहे. आम्ही पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर किंवा या सामन्यानंतर आम्ही काय होतंय ते पाहू. मात्र सध्या माझं लक्ष यावर नाही. मी सध्या केवळ पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रित केलं आहे," असं बाबर म्हणाला.


मी मागील अडीच ते 3 वर्षांपासून...


कर्णधारपदामुळे वैयक्तिक कामगिरीवर परिणाम झाल्याचा दावाही बाबरने खोडून काढला आहे. कर्णधारपद असल्याने धावा करण्यात अपयश येत असल्याचा दावा अयोग्य असल्याचं बाबरने म्हटलं आहे. "मी मागील 3 वर्षांपासून संघाचं नेतृत्व करत आहे. यापूर्वी मी कधीच असा अपयशी झालेलो नाही. मी वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने खेळणं अपेक्षित होतं तसा खेळ माझ्याकडून झाला नाही. त्यामुळेच लोक आता मी दडपणाखाली असल्याचं म्हणत आहेत. मी कोणत्याही दडपणाखाली नाही. मी मागील अडीच ते 3 वर्षांपासून हे करतोय. मीच होतो जो उत्तम कामगिरी करत होतो आणि नेतृत्वही करत होतो. तेव्हा मी आता जे करतोय तेच करत होतो," असं बाबरने म्हटलं आहे. 


आजचा सामना अती महत्त्वाचा


आज कोलकात्यामधील ईडन गार्ड्न स्टेडियममध्ये वर्ल्ड कप 2023 मधील 42 वा सामना इंग्लंड आणि पाकिस्तानदरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना पराभूत झाल्यास पाकिस्तान सेमी फायलनच्या शर्यतीमधून बाहेर पडेल. मात्र नुसता विजय पाकिस्तानसाठी उपयोगाचा नाही हे ही महत्त्वाचं आहे. पाकिस्तानला नेट रन रेटमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी इंग्लंडला 280 हून अधिक धावांनी पराभूत करावं लागणार आहे.