विनेशचं स्वागत करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अपमान? सोशल मीडियावर टीकेची झोड Video
उत्साहाच्या भरात गर्दीला मॅनेज करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अवमान झाला. सध्या याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून बजरंगला ट्रोल केलं जात आहे.
Bajarang Punia Troll : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ही शनिवारी भारतात दाखल झाली. 17 ऑगस्ट रोजी सकाळी तिचे दिल्ली एअरपोर्टवर जंगी स्वागत करण्यात आले. विनेशच्या स्वागतासाठी तिचे चाहते मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते. यावेळी उत्साहाच्या भरात गर्दीला मॅनेज करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अवमान झाला. सध्या याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून बजरंगला ट्रोल केलं जात आहे.
विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून मेडल न घेता रिकाम्या होतीच भारतात परतावं लागलं. ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर तिला रौप्य पदक तरी देण्यात यावे यासाठी क्रीडा लवादाकडे याचिका करण्यात आलेली होती. मात्र ही याचिका क्रीडा लवादाने फेटाळली. विनेश ही भारताची पहिली कुस्तीपटू आहे, जिने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली होती.
तिरंग्याच्या पोस्टरवर उभा राहिला बजरंग :
विनेश फोगट जेव्हा दिल्ली विमानतळावर लँड झाली तेव्हा माध्यमाच्या प्रतिनिधींनी आणि तिच्या चाहत्यांनी विनेश भोवती गराडा घातला. यावेळी एअरपोर्टवर तिला रिसिव्ह करण्यासाठी आलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांना पाहून ती भावुक झाली. मात्र यापरिस्थितीत सुद्धा तिच्या भोवतीचा गराडा दूर जाण्याचं नाव घेत नव्हता. यावेळी बजरंग आणि पोलिसांच्या मदतीने विनेशला सुखरूप गाडी पर्यंत नेण्यात आले. त्यावेळी बजरंग गर्दीला पांगवत असताना गाडीच्या बोनेटवर चढला. परंतु गाडीच्या बोनेटवर तिरंग्याचा पोस्टर लावलेला होता. ज्याच्यावर बजरंग चपला घालून उभा होता. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून बजरंगने तिरंग्याचा अपमान केला आहे असा आरोप त्याच्यावर लावला जातोय.
काही बजरंगचं करतायत समर्थन :
काही लोक या घटनेवरून बजरंगला ट्रोल करतायत तर काहीजण त्याच समर्थन सुद्धा करतायत. काही लोकांचं म्हणणं आहे की बजरंगकडून ही चूक अनावधानाने घडली आहे. तो गर्दी आणि मीडियाला सांभाळत होता. असे असले तरी अनेकजण बजरंगवर टीका करत असून त्याने याबाबत माफी मागावी अशी मागणी करत आहेत.