Bajrang Punia Tweet On Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमधून बुधवारी रात्री भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली. क्रीडा लवादाने विनेश फोगटच्या ऑलिम्पिकमधील अपात्रतेनंतर आता तिच्या रौप्य पदकाची याचिका सुद्धा फेटाळली आहे. 14 ऑगस्ट रोजी भारताची कुस्तीपटू विनेश फोगटच्या याचिकेवर येणाऱ्या निर्णयाची भारतीय वाट पाहत होते. विनेशला महिलांच्या 50 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यापूर्वी केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर विनेशने रौप्य पदक दिलं जावं यासाठी क्रीडा लवादाकडे धाव घेतली होती, मात्र विनेशची ही याचिका फेटाळण्यात आल्याने भारतीयांची निराशा झाली. विनेशच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळल्यानंतर भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याची पोस्ट चर्चेत आहे. 


काय म्हणाला बजरंग पुनिया? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनेश फोगटच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळल्यावर बजरंग पुनियाने सोशल मिडीयावर कवितेच्या स्वरूपात पोस्ट केली. यात त्याने लिहिले की, "मी मानतो की या अंधकाराने तुझे पदक हिसकावले, पण तू हिऱ्या प्रमाणे संपूर्ण विश्वात चमकत आहेस. विश्वविजेत्या भारताची तू आन बान शान, रूस्तम ए हिंद विनेश फोगट तू देशाची कोहिनूर आहेस; संपूर्ण जगात विनेश फोगट हे नाव गाजत आहे. ज्यांना मेडल हवंय त्यांनी 15- 15 रुपयात विकत घ्या".  बजरंग पुनियाने विनेश फोगटच्या समर्थनार्थ यापूर्वी सुद्धा अनेक ट्विट केले आहेत. महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने सुद्धा बजरंग पुनियाची ही पोस्ट रिशेअर केली आहे. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले होते. गेल्यावर्षी महिला कुस्तीपटूंनी एकत्र येत भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक छळाचे आरोप करत, त्यांचे निलंब करून कारवाई करण्यात यावी यासाठी दिल्लीमध्ये आंदोलन पुकारले होते. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनियाने देखील महिला कुस्तीपटूंच्या या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. सध्या बजरंग पुनियाने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 



ब्रिजभूषण सिंहवर साधला निशाणा : 


2023 मध्ये महिला कुस्तीपटूंनी एकत्र येत भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक छळाचे आरोप केले होते. तसेच त्यांना निलंबित करण्यात यावे आणि कारवाई व्हावी अशी मागणी करण्यासाठी आंदोलन पुकारले होते. ब्रिजभूषण सिंह वर योग्य ती कारवाई होत नसल्याने कुस्तीपटूंनी "ब्रिजभूषण सिंहवर कारवाई झाली नाही तर आम्ही जिंकलेली पदक परत करू" असे म्हंटले होते. त्यावर ब्रिजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया देत असताना, "पदक १५ रुपयांमध्ये मिळतात, परत करायचंच असेल तर बक्षिसाची रक्कम परत करा" असे म्हंटले होते. या वक्तव्यावर चौफेर टीका झाल्यावर ब्रिजभूषण सिंह यांनी हे वक्तव्य मागे घेऊन याबाबत माफी मागितली होती. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर निशाणा साधून बजरंग पुनिया याने विनेश फोगट बाबतचे ट्विट केले असल्याचे बोलले जात आहे. 


बुधवार 14 ऑगस्ट रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष डॉ पीटी उषा यांनी कुस्तीपटू विनेश फोगटचा युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) विरुद्धचा अर्ज फेटाळण्याच्या कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) च्या लवादाच्या निर्णयावर धक्का आणि निराशा व्यक्त केली आहे. विनेशच्या पाठीशी उभे राहून, आम्ही विनेशचे म्हणणे ऐकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, कायदेशीर पर्याय शोधले जात आहेत, असं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने म्हटलं आहे.


हेही वाचा : Neeraj Chopra : नीरज चोप्राला कशा मुली आवडतात? गोल्डन बॉयने स्वतः केला खुलासा


 


आत्तापर्यंत काय काय झालं?


पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाची उपांत्य आणि उपांत्यपूर्व फेरी यशस्वीपणे पूर्ण करून विनेश फोगट अंतिम फेरीत पोहोचली होती. मात्र अंतिम फेरीपूर्वी केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले होते. भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने तिच्यावरील अपात्रतेच्या निर्णयावर क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. क्रीडा लवादाने कुस्तीपटू विनेश फोगाटची अपील स्वीकारली अन् तिचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर क्रिडा लवादाने हा निर्णय दिला आहे. तसेच जागतिक कुस्ती महासंघ आणि ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून आव्हान देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील समोर होती.


विनेश फोगाटने याआधी क्रीडा लवादाकडे फायनल थांबवावी, अशी अपिल केली होती. मात्र, लवादाने स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर विनेशला रौप्य पदक देण्यात यावं, अशी विनंती लवादाकडे करण्यात आली. या विषयावर मत मांडण्यासाठी विनेशला अनुमती दिली होती. त्यामुळे विनेशला मोठा दिलासा मिळाला होता. विनेशच्या वतीनं दुसऱ्या याचिकेमध्ये रौप्य पदकाची मागणी करण्यात आली होती. ज्यावर CAS कडून या प्रकरणी विचारपूर्वक निर्णय देण्याचे संकेत देण्यात आले. ज्यानंतर लगेचच विनेशची बाजू मांडण्यासाठी वकीलांशी शोधाशोध सुरू झाली आणि हरीश साळवे यांच्यापाशी येऊन हा शोध संपला. हरीश साळवे यांनी आतापर्यंत अनेक कायदेशीर संघर्षांचा निकाल आपल्या बाजूनं अतिशय प्रभावीरित्या वळवण्याची किमया केल्यामुळं सर्वांच्या नजरा निर्णयावर होत्या. पण आता विनेशला मेडल घेऊन भारतात येता येणार नाही.