Neeraj Chopra : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा सध्या चर्चेत आहे. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला भालाफेक मध्ये गोल्ड मेडल जिंकण्यात यश आले होते. मात्र 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले. भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये एकूण 6 मेडल्स जिंकले त्यात 5 ब्राँझ तर नीरजने जिंकलेल्या केवळ एका सिल्व्हर मेडलचा समावेश आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा त्याच्या परफॉर्मन्समुळे चर्चेत राहिलाच मात्र भारताची नेमबाज मनू भाकर हिच्याशी सुद्धा त्याचे नाव जोडले गेले. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात पॅरिसमध्ये मनू भाकरची आई ही नीरज चोप्रा सोबत बोलत होती. व्हायरल व्हिडीओमध्ये दोघांचे संभाषण रेकॉर्ड झाले नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी मनुची आई नीरज आणि मनूच्या लग्नाबद्दल बोलत असल्याचा तर्क लावला. यानंतर मनू आणि नीरज हे दोघे लग्न करणार का अशी चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली. मात्र यानंतर मनू भाकरचे वडील आणि स्वतः मनूने याबाबत खुलासा करून या अफवांचे खंडन केले होते.
सध्या सोशल मीडियावर नीरज चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात नीरज त्याला कशा मुली आवडतात याबाबत सांगताना दिसत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरजला काही वर्षांपूर्वी प्रमुख पाहुणे म्हणून 'डान्स प्लस' या रिऍलिटी शो मध्ये बोलवण्यात आले होते. यावेळी नीरजशी बोलताना शोच्या जजने नीरजला "तुला कशा मुली आवडतात? असा प्रश्न विचारला होता. यावर नीरजने उत्तर देताना म्हंटले की, "मी एक खेळाडू आहे, त्यामुळे मला वाटतं ती सुद्धा खेळाडू असावी, जिचा तिच्या कामावर फोकस असेल. एकमेकांच्या कुटुंबाचा सन्मान करेल. मला वाटतं हे बेस्ट आहे."
हेही वाचा : विनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?
भारताची नेमबाज मनू भाकरचे वडील राम किशन भाकर यांनी मनू आणि नीरज यांच्या लग्नाच्या अफवांचे खंडन करत म्हंटले की, "मनूच्या लग्नाबाबत विचार करण्यासाठी ती सध्या खूप लहान आहे. राम किशनने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "मनू सध्या खूप लहान आहे. तीच लग्नाचं वय नाही. सध्या आम्ही याबाबत अजिबात विचार करत नाही आहोत". तसेच त्यांनी मनूची आई आणि नीरज चोप्राच्या व्हायरल व्हिडीओबद्दल म्हंटले की, "मनूची आईला नीरजला आपल्या मुलाप्रमाणे मानते."
भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि नेमबाज मनू भाकर हे दोघे भारताच्या हरियाणा राज्याचे आहेत. दोघांचे भारतीय खेळात महत्वपूर्ण योगदान आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने भारताला गोल्ड मेडल जिंकून दिले होते. तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरच्या बंदुकीत बिघाड झाल्याने तिला पदक जिंकता आले नव्हते. परंतु मनूने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ही कसर भरून काढली. मनूने 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन ब्राँझ मेडल्स जिंकली. ती भारताची सर्वात यशस्वी महिला नेमबाज ठरली. तर नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावले.
मनू भाकरला न्यूज 18 च्या एका मुलाखतीत नीरज आणि तिच्या लग्नाबाबत सुरु असलेल्या चर्चांवर प्रश्न विचारला. यावर मनू म्हणाली की, नीरज आणि माझं जास्त बोलणं होतं नाही. आम्ही केवळ स्पर्धेत किंवा कार्यक्रमातच भेटतो. जी चर्चा सुरु आहे तसे काहीही नाही".