इंदूर : विराट कोहलीच्या बंगळुरूनं पंजाबचा तब्बल १० विकेटनं पराभव केला आहे. या विजयाबरोबरच बंगळुरूनं प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं आव्हान अजून कायम ठेवलं आहे. तर सततच्या पराभवामुळे पंजाबच्या चिंता मात्र वाढल्या आहेत. या मॅचमध्ये बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं टॉस जिंकून पंजाबला पहिले बॅटिंगला बोलावलं. विराटचा हा निर्णय बंगळुरूच्या बॉलरनी योग्य ठरवला आणि पंजाबचा १५.१ ओव्हरमध्ये फक्त ८८ रनवर ऑल आऊट केला. बंगळुरूच्या उमेश यादवनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर सिराज, ग्रॅण्डहोम, चहल आणि मोईन अलीला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. पंजाबच्या एरॉन फिंचनं सर्वाधिक २६ रन केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८९ रनचा पाठलाग करायला आलेल्या बंगळुरूनं एकही विकेट न गमावता ८.१ ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण केलं. विराट कोहलीनं नाबाद ४८ तर पार्थिव पटेलनं नाबाद ४० रन केले. या दणदणीत विजयामुळे बंगळुरूचा नेट रन रेटही सुधारला आहे. प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठीच्या स्पर्धेत या विजयाची मदत बंगळुरूला होऊ शकते.


पॉईंट्स टेबल झालं आणखी चुरशीचं


बंगळुरूच्या या विजयामुळे आयपीएलमधलं पॉईंट्स टेबल आणखी चुरशीचं झालं आहे. हैदराबाद आणि चेन्नईनं आधीच प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर उरलेल्या दोन जागांसाठी अजूनही ५ टीममध्ये चुरस सुरू आहे. कोलकाता, राजस्थान आणि पंजाबच्या टीमनी १२ पैकी ६ मॅच जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात १२ पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता तिसऱ्या, राजस्थान चौथ्या आणि पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे. तर मुंबई आणि बंगळुरूनं १२ पैकी ५ मॅच जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात १० पॉईंट्स आहेत. चांगल्या नेट रनरेटमुळे मुंबईची टीम सहाव्या आणि बंगळुरूची टीम सातव्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई आणि बंगळुरूला त्यांच्या उरलेल्या दोन्ही मॅच जिंकणं बंधनकारक आहे. या मॅच जिंकण्याबरोबरच इतर टीमच्या कामगिरीवरही दोन्ही टीमना अवलंबून राहावं लागणार आहे.


कोलकाता-राजस्थानचा मुकाबला महत्त्वाचा


मंगळवारी कोलकाता आणि राजस्थानमध्ये होणारा मुकाबला महत्त्वाचा असणार आहे. या दोघांमधली जी टीम ही मॅच जिंकेल तिच्या खात्यात १४ पॉईंट्स जमा होतील आणि प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी विजेत्या टीमला आणखी सोपं होईल.