India Vs Bangladesh 1st Test Match: भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना जाहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये सुरु आहे. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ 150 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने चांगलीच आघाडी मिळवली आहे. एकीकडे सामना सुरु असताना बांगलादेशचा बॉलिंग कोच अ‍ॅलन डोनाल्डनं टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडची माफी मागितली आहे. ही माफी 1997 साली खेळल्या गेलेल्या ट्राय सीरिजमधील एका सामन्यातील टीकेबाबत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड परफेक्ट बॅटर म्हणून ओळखला जातो. त्या सामन्यात पावसामुळे 40 षटकात 251 धावांचं टार्गेट देण्यात आलं होतं. त्यावेळी भारतीय संघाचं कर्णधारपद सचिन तेंडुलकरकडे होतं. या सामन्यात द्रविडनं 94 चेंडूत 84 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीतील एकमेव षटकार द्रविडने अ‍ॅलन डोनाल्डला मारला होता. मात्र इतकं करूनही हा सामना भारताने 17 धावांनी गमावला आहे.  या सामन्यात डोनाल्डने 7 षटकात 48 धावा देऊन 3 गडी बाद केले होते.  


"डरबनमध्ये खेळताना तसं वागणं चुकीचं होतं. द्रविड आणि सचिननं आम्हाला सळो की पळो करून सोडलं होतं. सामन्यादरम्यान मी त्याला डिवचलं होतं. पण खरं सांगायचं तर मी राहुल द्रविडचा सन्मान करतो. मला असं वाटतं की, राहुल द्रविडसोबत डिनरला जाऊन त्या चुकीबाबत माफी मागावी. त्यावेळी विकेट घेण्यासाठी मी चुकीचं वागलो होतो. आजही त्या चुकीबाबत माझं मन खातं. राहुल द्रविड खरंच महान खेळाडू आहे. जर तू माझं ऐकत असशील तर आज मी डिनरला नेऊन माफी मागतो", असं अ‍ॅलन डोनाल्डनं सोनी स्पोर्ट नेटवर्कशी बोलताना सांगितलं. 



दुसरीकडे, भारतीय संघाचा मुख्य कोच राहुल द्रविडनं अ‍ॅलन डोनाल्डचं कोतुक केलं आहे. "तो एक महान गोलंदाज आहे. माझ्या कारकिर्दीत मी त्याची भेदक गोलंदाजी अनुभवली आहे. अ‍ॅलन डोनाल्ड जेव्हा मला मैदानात दिसेल तेव्हा मी त्याला भेटेन. त्याला हातात बॉल आणि चेहऱ्यावर सनस्क्रिन नसल्याचं पाहून आनंद होईल', असं राहुल द्रविडनं सांगितलं.