एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. भारताने पहिले चारही सामने जिंकले असून, आपण वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तान आणि नेदरलँड संघाने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या सामन्यांमुळे बांगलादेश संघही भारताचा पराभव करु शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण बांगलादेशला अशी कामगिरी करणं शक्य झाली नाही. दरम्यान, बांगलादेश संघाचे प्रशिक्षक चंदिका हथुरुसिंघे यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कप सामन्यात बांगलादेशने पराभव केला तेव्हा भारताने आपल्या पाच खेळाडूंना विश्रांती दिली होती याची आपल्याला जाणीव असल्याचं म्हटलं आहे. तसंच भारतीय संघ सध्या वर्ल्डकपमध्ये ज्याप्रकारे खेळत आहे ते भीतीदायक असल्याचं ते म्हणाले आहेत. 


"भारताने आपली प्रत्येक बाजू सक्षम केली आहे. त्यांचे गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. बुमराह आपली सर्वोत्तम गोलंदाजी करत आहे. त्यांच्याकडे चांगले फिरकी गोलंदाज असून, अनुभवी गोलंदाज मधल्या ओव्हर्स टाकत आहेत. तसंच त्यांचे आघाडीचे फलंदाज तर आग ओकत आहेत. अजिबात न घाबरता ज्याप्रकारे भारतीय संघ खेळत आहे, ते फारच घाबरवणारं आहे. ते क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत. तसंच घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांच्याकडे मोठा पाठिंबाही आहे. त्यामुळे हा एक चांगला संघ असल्याचं दिसत आहे," असं चंदिका हथुरुसिंघे म्हणाले आहेत.


भारताने वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा अत्यंत लाजिरवाणा पराभव केला आहे. चारही सामन्यांमध्ये भारताने प्रथम क्षेत्ररक्षण केलं आहे. प्रथम गोलंदाजी करताना भारताने समोरील संघांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं आहे. यानंतर धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इतर फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत सहजपणे लक्ष्य गाठलं आहे. 


बांगलादेशने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या पहिल्या जोडीने 91 धावांची भागीदारी करत निर्णय सार्थ ठरवला होता. पण यानंतर बांगलादेशचे विकेट्स एकामागोमाग तंबूत परतत राहिले. अखेरच्या काही फलंदाजांच्या जोरावर बांगलादेशने 50 ओव्हर्समध्ये 8 गडी गमावत 256 धावा केल्या. रवींद्र जाडेजा, बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले. 


257 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने 40 चेंडूत 48 धावा करत दमदार सुरुवात करुन दिली. शुभमन गिलनेही 53 धावा ठोकल्या. यानंतर विराट आणि के एल राहुलने संघाला विजयापर्यंत नेलं. विराटने यावेळी 78 वं शतक ठोकलं. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. 


विराट कोहलीच्या वाईड बॉल वादावर कर्णधाराने केलं भाष्य


बांगलादेशविरोधातील सामन्यात विराट कोहलीने एकदिवसीय करिअरमधील 48 वं शतक झळकावलं. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असताना विराटने षटकार ठोकत शतक पूर्ण केलं. दरम्यान, गोलंदाजाने वाईड चेंडू टाकत विराटचं शतक हुकवण्याचा प्रयत्न केला. तर अम्पायरने वाईड न दिल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यावर त्यांचा सध्याचा कर्णधार नजमूल हुसेन शांतो याने प्रतिक्रिया दिली आहे.  


अहमदने जाणुनबुजून वाईड बॉल टाकल्याचा आरोप कर्णधार नजमूलने फेटाळला आहे. "नाही, अशी कोणतीही योजना नव्हता. ती एक साधी योजना होती. कोणत्याही गोलंदाजाचा वाईड बॉल टाकण्याचा हेतू नव्हता. आम्ही योग्य प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला," असं नजमूल शांतोने सांगितलं आहे.