बांगलादेशनं इतिहास घडवला, टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झालं हे रेकॉर्ड
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बांगलादेशचा इनिंग आणि १८४ रननं विजय झाला आहे.
मीरपूर : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बांगलादेशचा इनिंग आणि १८४ रननं विजय झाला आहे. या विजयाबरोबरच बांगलादेशनं २ टेस्ट मॅचची ही सीरिज २-०नं जिंकली आहे. बांगलादेशचा ऑफ स्पिनर मेहदी हसननं या मॅचमध्ये एकूण १२ विकेट घेतल्या. हसननं पहिल्या इनिंगमध्ये ७-५८ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ५-५९ अशी कामगिरी केली. पहिल्या इनिंगमध्ये ५०८ रनचा विशाल स्कोअर केला. महमदुल्लाह रियादनं टेस्ट क्रिकेटमधील त्याचा सर्वोत्तम स्कोअर १३६ रनची खेळी केली. यानंतर वेस्ट इंडिजची टीम १११ रनवर ऑल आऊट झाली. त्यामुळे बांगलादेशनं वेस्ट इंडिजला फॉलो ऑन दिला.
फॉलो ऑन दिल्यानंतर बॅटिंगला आलेल्या वेस्ट इंडिजची पुन्हा तशीच अवस्था झाली. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी वेस्ट इंडिजनं ५ विकेट गमावून ७५ रन केले होते. मेहदी हसननं ३६ रन देऊन ३ विकेट आणि शाकीब अल हसननं १५ रन देऊन २ विकेट घेतल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा विक्रम
वेस्ट इंडिजचे पहिले पाचही बॅट्समन बोल्ड झाले. टेस्ट क्रिकेटमध्ये असं फक्त याआधी ३ वेळा झालं आहे, जेव्हा सुरुवातीचे पाचही बॅट्समन बोल्ड झाले. याआधी ११ ऑगस्ट १८९० आणि २ जानेवारी १८७९ साली असं रेकॉर्ड झालं होतं. पण स्पिनरनी मात्र पहिल्यांदाच एखाद्या टीमच्या सुरुवातीच्या ५ विकेट घेतल्या आहेत.
दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ५ विकेट गमावल्यानंतर तिसऱ्या दिवशीही वेस्ट इंडिजला या मॅचमध्ये पुनरागमन करता आलं नाही. २१३ रनवर वेस्ट इंडिजची टीम ऑल आऊट झाली. यामुळे या मॅचमध्ये बांगलादेशचा इनिंग आणि १८४ रननी विजय झाला.