वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बांगलादेशी खेळाडूंचा विजयी `उन्माद`
अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा ३ विकेटने पराभव केला.
पॉचफेस्टरूम : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा ३ विकेटने पराभव केला. पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धा जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बांगलादेशने केली. पण या विजयानंतर बांगलादेशी खेळाडूंचा उन्माद मैदानावर पाहायला मिळाला. अथर्व अंकोलेकरच्या बॉलिंगवर विजयी रन केल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू धावत मैदानात आले.
बांगलादेशचे खेळाडू मैदानात आल्यानंतर दोन्ही टीममध्ये बाचाबाची झाली. बांगलादेशचे खेळाडू भारतीय खेळाडूंना काहीतरी म्हणाले. यानंतर अंपायरनी मध्यस्ती केली. मैदानावर कोणत्या खेळाडूने उचकवण्याचा प्रयत्न केला, याची माहिती मिळू शकलेली नाही. कॅमेरामध्येही या गोष्टींचं चित्रिकरण झालेलं नाही. आयसीसीकडून मात्र या प्रकारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
'या गोष्टी घडायला नको होत्या. प्रतिस्पर्धी टीमचा आणि खेळाचा आम्ही आदर केलाच पाहिजे,' असं बांगलादेशचा कर्णधार अकबर अली म्हणाला. बांगलादेशी खेळाडूंच्या या वर्तणुकीवर भारतीय टीमनेही नाराजी व्यक्त केली आहे.
'खेळामध्ये या गोष्टी होतच असतात. काही वेळा तुमचा पराभव होतो, तर काही वेळा तुम्ही जिंकता. पण त्यांची प्रतिक्रिया गलिच्छ होती. या गोष्टी घडायला नको होत्या,' असं भारताचा कर्णधार प्रियम गर्ग म्हणाला.
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशच्या बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताला १७७ रनवर ऑल आऊट केलं. यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८८ रनची खेळी केली. भारताच्या शेवटच्या ७ विकेट फक्त २२ रनवर गेल्या.