ढाका : क्रिकेटच्या मैदानात अनेक घटना घडल्याच्या तुम्ही आजपर्यंत पाहिल्या असतील. कधी कुणाला बॉल लागतो, कधी हाणामारी होते तर कधी शिविगाळ होते. पण आता एक धक्कादायक घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट मॅचमध्ये अंपायरिंग करणाऱ्या रफियुल इस्लाम या १७ वर्षीय तरुणाच्या छातीत अचानक बॉल लागला. छातीत बॉल लागल्यानंतर या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


बलूर मठ मैदानात ही घटना घडली आहे. स्थानिक पोलीस इनामुल हक यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मुलं मैदानात क्रिकेट खेळत होते. त्यावेळी रफियुल इस्लाम हा अंपायरिंग करत होता. पण, अचानक एक बॉल रफियुलच्या छातीत लागला आणि तो खाली कोसळला. रफियुल इस्लाम याचे वडील रिक्षाचालक असून आई घरकाम करते.


तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे ऑस्ट्रेलियन बॅट्समन फिलिप ह्यूज याचा मृत्यू झाला होता. सिडनीमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियासोबत खेळत असताना न्यू साऊथ वेल्स टीमचा बॉलर सीन अबॉर्ट याचा बॉल ह्यूजच्या मानेला लागला. बॉल लागल्यानंतर ह्यूज मैदानातच कोसळला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.


ह्यूजच्या मृत्यूनंतर एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने कुणालाही ह्यूजच्या मृत्यूला जबाबदार धरलं नाही. पण समितीने खेळाला आणखीन सुरक्षित करण्यासाठी काही सूचना दिल्या. ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रशासनाने म्हटलं की, ते या सूचनांना लवकरच अमलात आणणार आहेत.