मुंबई : स्पॉट फिक्सिंगच्या आरोपानंतर आणि बंदीच्या निर्णयानंतर क्रिकेटर शांताकुमारन श्रीसंत दुसऱ्याच एखाद्या देशाकडून खेळायच्या विचारात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बीसीसीआय' एक खाजगी संस्था आहे, अशावेळी दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्यासाठी स्वतंत्र असल्याचं एस श्रीसंतनं म्हटलंय. 


'एशियानेट न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत श्रीसंतनं ही इच्छा व्यक्त केलीय. आपलं उरलेल्या करिअरमध्ये दुसऱ्या एखाद्या देशाकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा असल्याचं त्यानं म्हटलंय. 


'मला बीसीसीआयनं बॅन केलंय... आयसीसीनं नाही... जर भारत नाही तर मी दुसऱ्या एखाद्या देशासाठी क्रिकेट खेळू शकतो. मी ३४ वर्षांचा आहे आणि जास्तीत जास्त आणखी सहा वर्ष क्रिकेट खेळू शकतो... बीसीसीआय एक खाजगी संस्था आहे... हे आपण आहोत जे याला भारतीय क्रिकेट टीम म्हणतो, परंतु, शेवटी बीसीसीआय ही प्रायव्हेट बॉडीच आहे...' असं श्रीसंतनं म्हटलंय. 


इंडियन प्रिमियर लीग २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांत त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. १८ सप्टेंबर २०१७ रोजी कोर्टानं त्याला या आरोपांतून मुक्त केलं होतं. परंतु, बीसीसीआयनं दाखल केलेल्या याचिकेननंतर १७ ऑक्टोबर रोजी केरळ हायकोर्टाच्या खंडपीठानं बीसीसीआयचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा देत त्याच्यावरची खेळण्याची बंदी कायम ठेवलीय.