`आशिया-११` टीममध्ये या भारतीयांचा समावेश, वर्ल्ड-११विरुद्ध खेळणार
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आशिया-११ टीमची घोषणा केली आहे.
मुंबई : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आशिया-११ टीमची घोषणा केली आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबुर रहमान यांच्या १००व्या जयंतीनिमित्त आशिया-११ आणि वर्ल्ड-११ यांच्यामध्ये दोन टी-२० मॅच खेळवण्यात येणार आहेत. १८ मार्च आणि २१ मार्चला या दोन मॅच ढाक्याला होतील.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने घोषित केलेल्या टीममध्ये सहा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. आशिया-११ च्या टीममध्ये एकही पाकिस्तानी खेळाडू नाही. विराट कोहली, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, केएल राहुल, ऋषभ पंत आणि शिखर धवन हे सहा भारतीय खेळाडू आशिया-११चं प्रतिनिधीत्व करतील. केएल राहुल एका मॅचसाठी टीममध्ये असेल, तर विराट कोहलीने अजून त्याची उपलब्धता कळवलेली नाही.
आशिया-११ टीममध्ये ६ भारतीय खेळाडू असले तरी ज्या दिवशी आशिया-११ आणि वर्ल्ड-११ ची पहिली मॅच आहे, त्याच दिवशी भारत आणि दक्षिण आफ्रिकेची शेवटची वनडे मॅच आहे. त्यामुळे भारताचे सगळे ६ खेळाडू २१ मार्चला होणाऱ्या शेवटच्या मॅचमध्येच खेळण्याची शक्यता आहे.
आशिया-११ टीममध्ये सहा भारतीय खेळाडूंसोबतच बांगलादेशचे तमीम इक्बाल, लिटन दास, मुशफिकुर रहीम तर श्रीलंकेचे थिसारा परेरा आणि लसिथ मलिंगा, अफगाणिस्तानच्या रशीद खान आणि मुजीब उर रहमान, नेपाळच्या संदीप लमिचने यांची निवड करण्यात आली आहे.
आशिया-११ टीम
केएल राहुल (एका मॅचसाठी), विराट कोहली(अजून होकार नाही), शिखर धवन, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, लिटन दास, तमीम इक्बाल, मुशफिकुर रहीम, थिसारा परेरा, राशिद खान, मुस्तफिजूर रहमान, संदीप लमिचने, लसिथ मलिंगा, मुजिबुर रहमान