मुंबई : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे. भरत अरुणची टीम इंडियाचा बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती होणार आहे. क्रिकेट नेक्स्ट या वेबसाईटशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबत खुलासा केला आहे. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यापासूनच भरत अरुण टीम इंडियासोबत असेल असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झहीर खानची टीम इंडियाच्या बॉलर्सचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सचिन, सौरव आणि लक्ष्मणच्या समितीनं झहीरची निवड केली होती. पण झहीर खानला संपूर्ण वेळ टीमबरोबर राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे रवी शास्त्रीनं पूर्णवेळ कोचची मागणी केली होती.


भरत अरुणची कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली असली तरी झहीर खानची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. झहीरच्या नियुक्ती आणि मानधनाबाबत बीसीसीआयनं नव्या चार सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली आहे.


झहीरच्या नियुक्तीबाबत मला कोणताही आक्षेप नाही. झहीरच्या सल्ल्यामुळे टीम इंडियाच्या बॉलरना फायदाच होणार आहे. झहीरनं दिलेल्या सल्ल्यांची भारतीय बॉलर्स योग्य अंमलबजावणी करतात का हे भरत अरुण पाहिलं, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगतिलं आहे.


कोण आहे भरत अरुण?


रवी शास्त्री २०१४ ते २०१६ टीम इंडियाचा डायरेक्टर असताना अरुण हाच टीम इंडियाचा बॉलिंग कोच होता पण २०१६ साली शास्त्रीला बाहेरचा रस्ता दाखवल्यावर अरुणलाही डच्चू देण्यात आला होता.


अंडर १९ च्या दिवसांपासूनच शास्त्री आणि अरुणची मैत्री आहे. खेळाडू म्हणून अरुणचं प्रदर्शन फारसं चांगलं नसलं तरी त्यांना एक उत्कृष्ट अकॅडमी कोच म्हणून ओळखलं जातं. शास्त्रीनं शिफारस केल्यावरच बीसीसीआयचे तत्कालिन अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी अरुणची टीम इंडियाचा बॉलिंग कोच म्हणून निवड केली होती. त्याआधी अरुण नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे कोच होते.