BCCIच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी अजित सिंह यांची निवड
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अजित सिंह यांची बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी निवड केली आहे. अजित सिंह हे राजस्थान पोलिसांचे माजी पोलीस महासंचालक होते.
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अजित सिंह यांची बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी निवड केली आहे. अजित सिंह हे राजस्थान पोलिसांचे माजी पोलीस महासंचालक होते.
कोण आहेत अजित सिंह
अजित सिंह हे १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी अजित सिंह हे राजस्थान पोलिसांच्या सेवेतून मुक्त झाले. त्यांनी जवळपास ३६ वर्षे भारतीय पोलीस दलासाठी काम केलं.
...म्हणून अजित सिंह यांना दिली जबाबदारी
अजित सिंह यांना राजस्थान पोलिसांच्या भ्रष्टाचार विरोधी पथकात काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी अजित सिंह यांना दिल्याचं बोललं जात आहे.
सध्या यांच्याकडे जबाबदारी
माजी दिल्ली पोलिस आयुक्त नीरज कुमार हे सध्या बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचं नेतृत्व करत आहेत. नीरज कुमार यांचा कार्यकाळ ३१ मे २०१८ पर्यंत आहे.
या दिवशी स्विकारणार पदभार
७ एप्रिलपासून आयपीएलचा ११ वा सीजन सुरु होत आहे. यंदाचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी अजित सिंह आपला पदभार स्विकारणार असल्याचं बोललं जात आहे.
राजस्थान पोलिसांमध्ये भ्रष्टाचार विरोधी पथकात काम करताना अजित सिंह यांनी भ्रष्टाचारासंबंधी अनेक प्रकरणं हाताळली आहेत. त्याचा फायदा त्यांना आता या कामातही होणार आहे.